करोना निर्बंधांमुळे युरोपमधून आणण्यात ठाणे महापालिकेला अडचणी

ठाणे : गगनचुंबी इमारतींमध्ये आग लागल्यास ती विझवण्यासाठी किंवा मदतकार्यासाठी ठाणे महापालिकेने खरेदी केलेली ९० मीटर उंच शिडी असलेले वाहन युरोपात अडकून पडले आहे. करोना संक्रमणामुळे आलेल्या निर्बंधांमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन वाहन तपासणी करणे कठीण बनले आहे. त्यामुळे आता ब्रिटनमधील कंपनीमार्फतच वाहन तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या प्रक्रियेत अजून कालावधी जाणार असल्याने हे वाहन सहा-सात महिन्यांनंतरच ठाणे अग्निशमन दलात रुजू होण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये टोलेजंग इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा इमारतींच्या वरच्या मजल्यांवर आग लागल्यास अथवा एखादी दुर्घटना घडल्यास मदतकार्य करण्यासाठी अग्निशमन दलाची विद्यमान यंत्रणा अपुरी पडते. अग्निशमन दलाकडे सध्या ५४ मीटर उंचीपर्यंत जाऊ शकणारी शिडी असलेले वाहन आहे. मात्र, त्याहून उंच इमारतींसाठी ही शिडी अपुरी पडते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने ९० मीटर उंच शिडीच्या खरेदीचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला २०१९मध्ये मान्यता मिळाली. हे वाहन २०२०मध्ये अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार होते. मात्र, करोना प्रादुर्भावामुळे या वाहनाचे आगमन लांबणीवर पडले आहे.
युरोपमधील फिनलँडमधील एका कंपनीकडून ठाणे महापालिकेने ९० मीटर उंचीची शिडी खरेदी केली आहे. या वाहनाच्या खरेदीपूर्वी तिची तपासणी करावी लागते. यासंबंधीचे पत्र संबंधित कंपनीने महापालिकेला पाठविले होते. गेल्या वर्षीपासून संपूर्ण जगभरात करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना तिथे जाऊन वाहनाची तपासणी करणे शक्य झालेले नाही. गेल्या वर्षीच्या अखेरीस भारतात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी युरोपमध्ये मात्र करोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली होती. तसेच या देशाची व्हिसा सेवा बंद असून या ठिकाणी प्रवाशांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे अद्यापही महापाालिका अधिकाऱ्यांना तिथे जाऊन तपासणी करणे शक्य होत नाही. ही प्रक्रिया रखडल्याने महापालिकेच्या ताफ्यात अजूनही हे वाहन दाखल होऊ शकलेले नाही, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

स्थानिक कंपनीकडूनच तपासणी

युरोपमधील फिनलँडमध्ये जाऊन  वाहनाची तपासणी करणे शक्य नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने आता जुन्या प्रस्तावातील अटींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, तेथील एका खासगी कंपनीकडूनच आता वाहनाची तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी अशाच प्रकारे मुंबई महापालिकेने ६० मीटर उंच शिडीच्या वाहनाचे, भिलाई स्टील प्लँट यांची ३२ मीटर उंची शिडीचे वाहन, भारत पेटोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे ४४ मीटर उंची शिडीच्या वाहनाची तपासणी करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने प्रस्तावात केला आहे.