ठाणे : घोडबंदर मार्गावरील कासारवडवली परिसरातील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग मंदावल्याने ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर शनिवारी दुपारी वाहतूक कोंडी झाली. कासारवडवली ते मानपाड्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीत अडकून पडू नये म्हणून घोडबंदर मार्गाचा वापर टाळा, असे आवाहन ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना केले आहे.

मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतूकीसाठी घोडबंदर मार्ग महत्वाचा मानला जात आहे. घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. ही वाहने घोडबंदर मार्गे वाहतूक करतात.

याशिवाय, या मार्गावरून दुपार आणि रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. सततच्या वाहन वर्दळीमुळे या मार्गावर कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे हा मार्ग अनेक ठिकाणी अरुंद झाला असून येथील चिंचोळ्या मार्गामुळेही कोंडीत भर पडत आहे. त्यातच यंदाच्या पावसाळ्यात या मार्गावर खड्डे पडल्याने कोंडीत वाढ होत आहे.

कासारवडवली भागात उड्डाण पुल उभारणीचे काम सुरू असून यामुळे याठिकाणी अरुंद रस्त्यावरून वाहनांची वाहतूक सुरू आहे. असे असतानाच, या भागातील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक संथगतीने सुरू असून यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोंडीची समस्या निर्माण होत आहे. शनिवारी दुपारी हेच चित्र दिसून आले. कासारवडवली परिसरातील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर शनिवारी दुपारी वाहतूक कोंडी झाली. कासारवडवली ते मानपाड्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या कोंडीत अडकून पडू नये म्हणून घोडबंदर मार्गाचा वापर टाळा, असे आवाहन ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे. वाहनचालकांनी घोडबंदर मार्गाचा वापर टाळावा. जेणेकरून वाहतूक कोंडीत अडकणार नाही. वाहनचालकांनी कासारवडवली, आनंदनगर, हिरानंदानी या भागात जाण्यासाठी कापूरबावडी येथून कोलशेत रस्त्याने ब्रह्मांड सर्कल, विजय गार्डन, आयुक्त बंगला सर्कल या मार्गे वाहतूक करावी. तसेच विरुद्ध मार्गावरून वाहतूक करू नका, असे आवाहन उपायुक्त शिरसाट यांनी केले आहे.