ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश, प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत तसेच दिवा आणि मुंब्रा येथील विशेष दक्षता पथकांच्या पाहणीत आढळलेल्या एकूण २६४ अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली आहे. त्यापैकी १९८ बांधकामे पूर्णपणे पाडण्यात आले आहेत. तर, ६६ बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात आले आहे. तसेच अनधिकृत बांधकाम प्रकरणी ठाणे महापालिकेने जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत एकूण ५० गुन्हे दाखल केले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात जून महिन्यापासून अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कारवाईचा आढावा घेतला. या आढावा बैठकीस, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक नगररचना संचालक संग्राम कानडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, विधी अधिकारी मकरंद काळे, सर्व प्रभाग समितीचे सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.
कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू राहू नये यासाठी सर्व यंत्रणेने दक्ष राहावे. तसेच, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक त्या प्रकरणात तातडीने ‘एमआरटीपी’अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. गुन्हे दाखल करताना प्रत्यक्ष पाहणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक माहिती नोंदवावी, असेही त्यांनी सांगितले. ज्या अनधिकृत बांधकामांचे पाडकाम शिल्लक असेल त्याचे प्रवेश मार्ग (जिने) पाडून पत्रे लावून बंद करावेत, असेही त्यांनी म्हटले. तसेच, अनधिकृत बांधकामात घर घेऊ नये असे आवाहन करणारे फलक मोक्याच्या जागी उभे करावे. नागरिकांनाही घर खरेदी करताना बांधकाम अधिकृत असल्याची खात्री महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अधिकृत इमारतीच्या बांधकाम ठिकाणी क्यूआर कोड
- ज्या ठिकाणी अधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू आहे, तेथे दर्शनी भागात क्यूआर कोड लावण्यात आले आहे. क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन करून बांधकाम परवानगीची माहिती कोणालाही उपलब्ध होऊ शकते, असेही राव यांनी स्पष्ट केले.
मोहीमेची अमलबजावणी
- महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, प्लिंथचे बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेची अमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरुपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत.
अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हे (१ जून ते २७ सप्टेंबर)
प्रभाग समिती
- नौपाडा- कोपरी – ०१
- दिवा – ११
- मुंब्रा – १३
- कळवा – ०४
- उथळसर – ०१
- माजिवडा-मानपाडा – ०५
- वर्तक नगर – ०८
- लोकमान्य नगर – सावरकर नगर- ०७
- एकूण – ५०