अंबरनाथ : अंबरनाथ काटई रस्त्यावर काही ठिकाणी रस्त्यांचे काम अपूर्ण असून या भागात असलेले खड्डे सातत्याने पडणारा पाऊस आणि दुरूस्तीअभावी कलेकलेने वाढत असल्याचे दिसून आले आहे. वसार गावाजवळ ग्नीनलीफ हॉटेलसमोर काटईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर १२ ते १५ फुट लांबी – रूंदीचा खड्डा तयार झाला आहे. पाण्यामुळे वाहन नेमके चालवायचे कसे असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. काटईहून येणाऱ्या मार्गिकेवरही वेगळी स्थिती नाही. त्यामुळे येथून प्रवास करताना खड्ड्यांचे झटके यामुळे प्रवासी आणि वाहनचालक त्रस्त आहेत.
ठाणे जिल्ह्यातील खड्डे आणि वाहतूक कोंडीची मालिका काही संपताना दिसत नाही. उलट कोंडी आणि खड्ड्यांचे प्रमाण वाढत असल्याचेच दिसून आले आहे. बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसराला डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई प्रवासासाठी आवश्यक असलेल्या अंबरनाथ काटई रस्ता महत्वाच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू आहे. या कॉंक्रिटीकरणाचे जवळपास काम पूर्णत्वास आले आहे. मात्र या संपूर्ण मार्गात तीन ते चार ठिकाणी रस्त्याचे काम रखडल्याचे दिसून आले आहे. यात अंबरनाथ शहरात ग्रीन सिटीजवळ, वालधुनी येथे, वसार गावाजवळ आणि खोणी गावाजवळ रस्त्याचे कॉंक्रिटीकरण रखडले आहे. यामुळे पूर्ण मार्गावर वेगाने जाणारी वाहने येथे येऊन थांबतात. येथे फक्त कॉंक्रिटीकरणाचे कामच अपूर्ण नाही तर सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने पाणी साचून खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे इतके मोठे आहेत की येथून वाहन चालवणे तारेवरची कसरत होते आहे. वसार गावाजवळ अनेक ढाबे आणि हॉटेल आहेत. याच भागात संपूर्ण मार्गितील सर्वात मोठे आणि अधिक खड्डे आहेत.
वसार येथील ग्रीनलीफ हॉटेलसमोरली खड्डे जवळपास १० फुट रूंद आणि १५ फुट लांबीचे आहेत. त्यांची खोली एक ते दीड फुटापर्यंत आहे. संपूर्ण रस्ताच खड्डा व्यापत असल्याने वाहन चालवायचे कुठून असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. येथून जाताना वाहने आदळतात त्यामुळे वाहनांचे भाग नादुरूस्त होत आहेत. तर प्रवाशांनाही खड्ड्यांमुळे मणका, हाडांना झटके बसत आहेत. या भागातून पाण्याचा निचरा होण्याची यंत्रणा नाही त्यामुळे पाऊस सुरू असताना पाणी साचते. त्याचा वाहनचालकांना मोठा फटका बसतो आहे.
वर्षानुवर्षे खड्ड्यातच
ज्या वसार भागात सध्या खड्डे आहेत तो भाग वर्षानुवर्षे वाहतुकीसाठी अडचणीचा ठरतो आहे. जागेच्या प्रशासकीय घोळामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी हाच भाग अनेक महिने वाहतुकीसाठी अडवून ठेवला होता. त्यानंतर याच भागात जलवाहिनी बदलण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे अनेक दिवस येथील वाहतूक एकाच मार्गिकेवरून होत होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून हाच भाग सर्वाधिक खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा बनला आहे.