ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा भागात बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी नसले तरीही वाहतुक कोंडी झाल्याने कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना कोंडीचा सामना सहन करावा लागला.

माजिवडा येथील फ्लाॅवर व्हॅली परिसरातून बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास एक व्हॅन ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतुक करत होती. त्याचवेळी एका कंटेनरने त्या व्हॅनला धडक दिली. त्यामुळे व्हॅन विरुद्ध दिशेकडील वाहिनीवर जाऊन ठाणे महापालिकेच्या घंटागाडीला धडकली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वाहतुक पोलीस कर्मचारी, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, घनकचरा विभागाचे कर्मचारी दाखल झाले. एक हायड्रा मशीन आणि टोविंग व्हॅन मशीन ही यंत्रणा आल्यानंतर येथील अपघातग्रस्त वाहने रस्त्यामधून बाजूला करण्यास सुरुवात झाली.

या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरीही अपघातामुळे काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्यांना कोंडीचा फटका बसला. अपघातमुळे येथील मार्गावर वाहनातील तेल देखील सांडले होते. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मार्गावर माती पसरवली असून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.