ठाणे : ठाण्यातील वर्तकनगर भागात तीन शाळकरी मुलींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या विद्यार्थीनी १६ ते १७ वयोगटातील आहेत. तर, विनयभंग करणारी व्यक्ती ३० ते ३५ वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोमवारी हा प्रकार घडला. या भागातील एका शाळेत विद्यार्थीनी जात होत्या. सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास एका विद्यार्थीनीचा अज्ञात ३० ते ३५ वयोगटातील व्यक्तीने विनयभंग केला. पिडीत मुलगी घरी आल्यानंतर तिने याबातची माहिती तिच्या पालकांना दिली. त्यानंतर सोमवारी दुपारी मुलीचे पालक वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. काहीवेळाने आणखी दोन विद्यार्थीनी अशाचप्रकारे विनयभंग झाल्याची तक्रार देण्यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गेल्या.
विद्यार्थीनींनी दिलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, विद्यार्थीनींनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी एकच असून तो ३० ते ३५ वयोगटातील आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. तर याप्रकरणात तीन मुलींनी तक्रार दाखल केल्याची माहिती परिमंडळ पाच (वागळे इस्टेट) उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.