ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात रस्त्यावर कोणत्याही प्रकारे खड्डे पडणार नाही, याबाबतची दक्षता घेतली असून जर रस्त्यावर खड्डा पडता तर तो तात्काळ अत्याधुनिक पध्दतीने बुजविला जाईल, असे आश्वासन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी माजी नगरसेवकांना बैठकीत दिले. तसेच शहरात सुरू असलेली मान्सूनपूर्व कामे येत्या ३१ मे पर्यत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व प्राधिकरणांना दिल्याचे सांगत मान्सून कालावधीत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम करण्याचे निर्देश त्यांनी अधिकऱ्यांना यावेळी दिले.

ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी माजी नगरसेवक आणि महापालिका प्रशासन यांच्यासमवेत महापालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मनिष जोशी, शंकर पाटोळे यांच्यासह सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि महापालिकेतील माजी नगरसेवक उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीला उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व करण्यात आलेल्या कामाची माहिती सादर केली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिंधीनी आपापल्या विभागात नागरिकांना भेडसावत असलेल्या कामांबाबतच्या समस्या मांडल्या. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी समस्यांचे निराकरण तातडीने करावे, अशी मागणी केली. या बैठकीत नालेसफाई, अंतर्गत गटारांची साफसफाई, वृक्षछाटणी, रस्ते दुरूस्ती, सखल भागात साचणारे पाणी, आरोग्य याबाबत ज्या सूचना करण्यात आलेल्या आहे, त्याची प्रशासनाने नोंद घेतली असून याबाबत आवश्यक ती कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करण्यात येईल असेही आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

ठाणे महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामे जलदगतीने सुरू असून सर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण होण्याच्या दृष्टीने महापालिकेने नियोजन केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनांनुसार सर्व कामांवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. पावसाळयामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी महापालिका यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहे, असे आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत सांगितले. सर्व प्रभागसमितीनिहाय नालेसफाईचे काम युदधपातळीवर सुरू आहे, परंतु मध्यंतरी झालेल्या पावसामुळे डोंगराहून वाहून आलेला गाळ नाल्यात आल्याने पुन्हा नालेसफाई केली जाणार आहे, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. त्या त्या विभागातील स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून काम करावीत, अशा सुचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नालेसफाईबरोबरच अंतर्गत गटारे, रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटारे देखील साफ केली जातील. तसेच पावसाळ्यात रस्त्यावर कोणत्याही प्रकारे खड्डे पडणार नाही याबाबतची दक्षता घेतली असून जर खड्डा पडता तर तो तात्काळ अत्याधुनिक पध्दतीने बुजविला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. सद्यस्थितीत जी कामे सुरू आहेत, त्याबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना घेवून तशा पध्दतीने कामे करावीत आणि मान्सून कालावधीत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून कामे करण्याचे निर्देश त्यांनी सर्व उपायुक्त आणि सहायक आयुक्त यांना दिले.

तर त्या रस्त्यावरील खड्डे पालिका बुजविणार

यंदा एप्रिलपासूनच शहरातील झाडांची छाटणी सुरू केलेली आहे. परंतु ज्या ठिकाणी अद्याप वृक्षछाटणीची कामे बाकी आहे, ती देखील ३१ मे पूर्वी पूर्ण केली जातील. वृक्ष छाटणीनंतर जमा झालेल्या हरित कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. महापालिका क्षेत्रात एमएमआरडीए, एमएमआरडीसी, मेट्रो प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग या प्राधिकरणांच्या अखत्यारितील देखील कामे सुरू आहेत. हि कामे ३० मे पूर्वी पुर्ण करण्याच्या सूचना देखील त्यांना देण्यात आल्या आहेत. परंतु पावसाळ्यात संबंधित प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही रस्त्यावर खड्डा पडल्यास ते काम नागरिकांच्या सोईसाठी महापालिका करेल असेही आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्या सक्त सूचना

पावसाळ्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व विभागांनी संगनमताने काम करावयाचे आहे, कोणत्याही विभागाची तक्रार प्राप्त झाल्यास ती जबाबदारी एकमेकांवर न ढकलता नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले. महापालिका क्षेत्रात सुरू असलेली मान्सूनपूर्व कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सुचना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला केली.