ठाणे : अवजड वाहनांच्या प्रवेशाची नियमावली काटेकोरपणे पाळली जावी. वाहतूक विभागाच्या मदतीसाठी आणखी १०० वाहतुक साहाय्यक तातडीने उपलब्ध करून देण्यात यावेत. त्यांचे नियोजन कापूरबावडी ते गायमुख या पट्ट्यात करण्यात यावे. वाहतूक पोलीस आणि वाहतुक साहाय्यक हे सकाळी सहा वाजेपासूनच तैनात असतील. सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या काळात त्यांची विशेष नेमणूक असेल, असे आयुक्त राव यांनी सांगितले. तसेच समस्यांबाबत समन्वय साधण्यासाठी महापालिकेच्या वतीने अधिकाऱ्याची नेमणूक देखील करण्यात आली आहे.

गेल्याकाही दिवसांपासून विविध कारणांमुळे घोडबंदर मार्गावर वाहतुक कोंडी होत आहे. या वाहतुक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून प्रशासनाच्या कारभाराविषयी नागरिक संताप व्यक्त करत आहेत. घोडबंदर येथील कोंडीच्या समस्या विषयी काही नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. परंतु भेट होऊ शकली नव्हती. अखेर कोंडीच्या प्रश्नावर शुक्रवारी महापालिका मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार प्रताप सरनाईक, घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या नागरिकांचे प्रतिनिधी, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : ठाण्यातील महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा मार्ग मोकळा

घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. त्याचा परिणाम नागरिकांना लवकरच दिसू लागेल. सध्याच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घ मुदतीच्या उपाययोजना हाती घेण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. अवजड वाहनांच्या प्रवेशाची नियमावली काटेकोरपणे पाळली जावी. वाहतूक विभागाच्या मदतीसाठी सध्या ५० वाहतुक साहाय्यक आहेत. आणखी १०० वाहतुक साहाय्यक तातडीने उपलब्ध करून देण्यात यावेत. त्यांचे नियोजन कापूरबावडी ते गायमुख या पट्ट्यात करण्यात यावे. वाहतुक पोलीस आणि साहाय्यक हे सकाळी सहा वाजल्यापासूनच रस्त्यावर तैनात असतील. सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या काळात त्यांची विशेष नेमणूक असेल असे निर्देश राव यांनी दिले. रस्त्याची स्थिती सुधारण्यासाठी पालिका तत्काळ उपाययोजना करीत असून त्याचे परिणाम १५ दिवसात दिसू लागतील. घोडबंदर भागात दिशा दर्शक, उड्डाणपूलाच्या सुरुवातीला मार्गदर्शक, थांब रेषा, प्रखर दिव्यांची उपाययोजना केली जाईल असेही आयुक्त राव म्हणाले. तसेच सेवा रस्त्यावर वाहने, हातगाड्या हटविण्याचे काम महापालिका तातडीने करणार आहे. तसे निर्देश उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्त यांना राव यांनी दिले. कार्यकारी अभियंता संजय कदम हे महापालिकेच्या वतीने संबंधित नागरिक, यंत्रणा यांच्याशी नोडल अधिकारी म्हणून समन्वय साधतील असेही त्यांनी स्पष्ट केले.