ठाणे: पावसाळ्यात घोडबंदर मार्गावर पाणी साचू नये तसेच वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ३० मे पर्यंत येथील कामे पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. घोडबंदर रोडवरील बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी उर्वरित कामे ३० मे पर्यंत यूद्धपातळीवर पुर्ण करण्याच्या सूचना केल्याचे राव यांनी सांगितले.

घोडबंदरसह शहरातील मुख्य रस्त्यावरील कामांची पाहणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. यावेळी महापालिका अधिकारी, वाहतुक विभागाचे अधिकारी, मेट्रोचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून या रस्त्याची सतत पाहणी करत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

संपूर्ण घोडबंदर रस्ता, गायमुख पर्यंत सुरू असलेली कामे पुर्ण होत आली आहेत, शेवटच्या टप्प्यातील कामे ३० मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्यात घोडबंदर रोडवरील पाणी साचू नये यासाठी सर्व मलनि:स्सारण वाहिन्यांचे आणि भूमिगत वाहिन्यांची सफाई सुरू आहे. जुन्या वाहिन्या या नव्या वाहिन्यांना जोडण्याचे काम सुरू असून ३० मे पूर्वी सर्व कामे केली जातील असेही त्यांनी नमूद केले.

कासारवडवली भागात एमएमआरडीएकडून उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या पुलाची पाहणी देखील आयुक्त राव यांनी यावेळी केली. सद्यस्थितीत या पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून उर्वरित कामे ५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले.