ठाणे : ठाणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात विविध विभागांना कर वसुलीसाठी ठरवून देण्यात आलेल्या उद्दीष्टापैकी ४१९ कोटी म्हणजेच २० टक्के कराची वसुली गेल्या तीन महिन्यात प्रशासनाने केली आहे. यात सर्वाधिक म्हणजेच २९१ कोटींची करवसुली ममालमत्ता करातून झाली असून सद्यस्थितीत पालिकेच्या तिजोरीत १०० कोटी रुपये जमा आहेत. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती सुधारताना दिसून येत आहे.

करोना काळापासून ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडली. शहरातील विकासकामांसाठी पालिकेच्या तिजोरीत पैसे नव्हते. उलट पालिकेवर तीन हजार कोंटींचा दायित्व झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन वर्षांपुर्वी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी शासनाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेला विविध प्रकल्पांसाठी निधी देऊ केला. तर, करोना काळानंतर पालिकेच्या तिजोरीत कराचे पैसे जमा होण्यास सुरूवात झाली. पण, हे पैसे दायित्व कमी करण्यावर खर्च होत होते. राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळालेल्या ठाणे महापालिकेच्या विविध विभागांनी गेल्यावर्षी अपेक्षित करवसुली केली नव्हती. यावरून पालिकेवर टिकाही झाली होती.

यंदाच्या वर्षी पालिकेने विविध विभागांना दिलेल्या कराच्या वसुलीसाठी एप्रिल महिन्यांच्या पहिल्या दिवसांपासूनच प्रयत्न सुरू केले आहे. ठाणे महापालिकेने यंदा ४ हजार १९७ कोटी २७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यात २ हजार ५० कोटी रुपये महसुली उत्पन्नातून अपेक्षित धरण्यात आले आहेत. यापैकी ४१९ कोटी रुपयांची कर वसुली तीन महिन्यात झाली असून तीची टक्केवारी २०.४६ टक्के इतकी आहे.

यंदाच्या वर्षात म्हणजेच २०२४-२५ या आर्थिक वर्षात पालिकेने मालमत्ता कर विभागाला ८१९ कोटी ७१ लाख रुपयांच्या करवसुलीचे उद्दीष्ट ठरवून दिले असून त्यापैकी जून महिन्यापर्यंत २९१ कोटींची वसुली केली आहे. शहर विकास विभागाला ६५० कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत ८७ कोटी ३३ लाखांची वसुली झाली आहे. पाणी पुरवठा विभागाला २६२ कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले असून त्यापैकी ८ कोटी ६३ कोटींची वसुली केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ६ कोटी ३० लाख, अग्निशमन दल ८ कोटी ३० लाख, स्थावर मालमत्ता विभाग ८९ लाख, घनकचरा ९ लाख, वृक्ष प्राधिकरण विभाग १ कोटी ६४ लाख इतकी करवसुली केली आहे.