ठाणे : वाहतूक कोंडी कमी व्हावी या उद्देशातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत घोडबंदर मार्गावर ५६० कोटी रुपये खर्चुन मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचे काम करण्यात येत आहे. मात्र, या कामामुळे कोंडी सुटण्याऐवजी त्यात वाढ होणार असल्याची भिती व्यक्त करत या कामास रहिवाशांकडून विरोध होत आहे. असे असतानाच, रस्ते जोडणी कामादरम्यान, नवीन विद्युत खांब बसविणे आणि त्याच्या विद्युत वाहिन्या टाकणे अशी कामे करण्यासाठी सुमारे ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या खर्चाचा भार आता ठाणे महापालिका उचलणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी ते गायमुख या ९.३० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून त्यात मुख्य आणि सेवा रस्ते जोडले जाणार आहेत. या कामासाठी ५६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हे काम करण्यात येत आहे. या कामामध्ये तब्बल २ हजार १९६ वृक्ष बाधित झाले आहेत. त्यापैकी १ हजार ६४७ वृक्षांवर पालिकेने कुऱ्हाड चालविली आहे तर, ५४९ वृक्षांचे पुर्नरोपण केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत असला तरी, त्यास नागरिकांकडून विरोध होत आहे. या प्रकल्पामुळे अपघात होण्याची भिती व्यक्त करत घोडबंदरवासियांनी या प्रकल्पास विरोध केला आहे. तसेच सेवा रस्त्याखाली असलेल्या मल, जल, विद्युत आणि महानगर गॅसच्या सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्याऐवजी त्यावरच गटारांची उभारणी आल्याचा दावा काही रहिवाशांनी यापुर्वी केला होता. तसेच कोणत्याही नियोजनाविनाच सुरु असलेला या प्रकल्पाचा पुनर्विचार व्हावा, असा सुर रहिवाशांकडून सुरूवातीपासूनच लावण्यात येत आहे.
घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी कामादरम्यान, जुने ४० ते ४५ विद्युत खांब हटवावे लागणार आहेत. काही ठिकाणी विद्युत रोहित्र आहेत, ते हटवावे लागणार आहेत. याशिवाय, उन्नत विद्युत वाहीन्याही काढाव्या लागणार आहेत. तसेच मुख्य आणि सेवा रस्ते कामानंतर नवीन विद्युत खांब आणि त्यासोबत वाहिन्या टाकण्याचे काम करावे लागणार आहे. या कामाचा कंत्राटमध्ये समावेश नव्हता. काही महिन्यांपुर्वी एमएमआरडीए, ठाणे महापालिका तसेच विविध प्राधिकरणांची एकत्रित बैठक पार पडली होती. या बैठकीत विद्युत कामांविषयी चर्चा झाली होती. मात्र, हा खर्च कोण करणार, यावर एकमत झाले नव्हते. तसेच हा खर्च शासनाने करावा अशी मागणी महावितरणने बैठकीत केली होती. दरम्यान, आता या खर्चाचा भार ठाणे महापालिका उचलणार आहे. रस्ते जोडणी कामादरम्यान, नवीन विद्युत खांब बसविणे आणि त्याच्या विद्युत वाहिन्या टाकणे अशी कामे करण्यासाठी सुमारे ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे, अशी माहीती पालिका सुत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.