Thane news : ठाणे : ‘मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या ठाणे महापालिकेच्या मॅरेथाॅन स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपट्टूंसह जवळपास २५ हजारांहून अधिक धावपट्टू धावणार आहेत. या स्पर्धेत लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यंदाही स्पर्धेत वेळ निश्चिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून त्याचबरोबर स्पर्धकांसाठी ठाणे ते बदलापूर अशी विशेष लोकलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी (Sandeep Malvi) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मॅरेथाॅन स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी, मीनल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. या स्पर्धेला रविवार, १० ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता महापालिका मुख्यालय चौकातून प्रारंभ होणार असून ही स्पर्धा विविध १२ गटात घेण्यात येणार आहे. यंदाही २१ किमी पुरूष आणि महिला, १८ वर्षावरील १० किमीच्या स्पर्धेसाठी वेळ निश्चिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या स्पर्धेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत, असे संदीप माळवी यांनी सांगितले.
ठाणे महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासाठी १ किमी ची ‘कॉर्पोरेट रन’ ठेवण्यात आली आहे. करोना संसर्गानंतर ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. ६ वर्षानंतर ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या दिवशी वातावरणनिर्मिती आणि स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्पर्धेच्या सरावासाठी झुंबा कसरतचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठासमोर झुंबा कसरत होणार आहे. या स्पर्धेत ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार असून या विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी परिवहन उपक्रमाच्या बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धकांना वेळेत पोहचता यावे यासाठी रविवारी सकाळी ५ वाजता बदलापूर ते ठाणे आणि दुपारी १ वाजता ठाणे ते बदलापूर अशी विशेष लोकल सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, असे संदीप माळवी यांनी सांगितले.
आतापर्यंत स्पर्धकांची नोंदणी
मॅरेथॉन स्पर्धेसाठी एकूण १३ हजार ८६० इतक्या स्पर्धकांनी कार्यालयात येऊन थेट नोंदणी केली आहे. त्यात ३ किमी अंतर स्पर्धेत १२ वर्षाखालील गटात २३७८ मुले आणि २०५१ मुली, ५ किमी अंतर स्पर्धेत 15 वर्षाखालील गटात ४६४१ मुले, ४०१८ मुली, १० किमी अंतर स्पर्धेत १८ वर्षाखालील गटात ९६५ मुले, १ किमी अंतर स्पर्घेत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक गटात २२ महिला आणि ११ पुरुष, १ किमी अंतर स्पर्धेत कॉर्पोरेट रन गटात १४ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. तर ऑनलाईन नोंदणी १८५० इतकी झाली आहे. त्यात २१ किमी अंतर खुला पुरुष गट स्पर्धेत ६१० तर, महीला गटात १९० स्पर्धकांचा समावेश आहे. १० किमी अंतर १८ वर्षावरील पुरूष गटात ७३०, १६ वर्षावरील महिला गटात ३२० स्पर्धकांनी नोंदणी केली आहे.
विजेत्यांना रोख पारितोषिके
यंदाच्या स्पर्धेत पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली आहे. विजेत्यांना एकूण १० लाख ३८ हजार ९०० रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. पहिल्या तीन गटातील स्पर्धा राज्यस्तरीय असून, २१ कि.मी गटातील पुरूष आणि महिला विजेत्यांसाठी पहिले पारितोषिक १ लाख, दुसरे ७५ हजार, तिसरे ५० हजार, चौथे ३० हजार, अशी आहेत. त्या शिवाय ५ ते १० पर्यतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक रोख पारितोषिक आणि चषके ठेवण्यात आली आहेत. १० कि.मी १८ वर्षावरील खुल्या गटातील स्पर्धा खारीगांव ते कोपरी मार्गे महापालिका भवन अशी असून स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक २५ हजार, दुसरे २० हजार, तिसरे १५ हजार, चौथे १० हजार, आणि ५ ते १० पर्यतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक रोख पारितोषिक आणि चषके ठेवण्यात आली आहेत. अशाचप्रकारे इतर गटासाठीही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक पुरूष आणि महिला या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.