ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक तसेच शहराच्या विविध भागातील वर्दळीचे रस्ते आणि पदपथावर ठाण मांडून बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच पादचाऱ्यांना पदपथावरन चालणे शक्य होत नसून या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर असलेले केंद्र शासनाचे फेरीवाला धोरण राबविण्यासाठी ठोस पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या महिनाअखेरपर्यंत फेरीवाल्यांची यादी अंतिम करत त्यातून निवडणूक घेऊन फेरीवाला असोसिएशनची स्थापना करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. यामुळे महापालिकेचे रखडलेले फेरीवाला धोरण पुढील महिन्यात मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठाणे रेल्वे स्थानक तसेच शहराच्या विविध भागातील वर्दळीचे रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांकडून अडविले जातात. या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच पादचाऱ्यांना पदपथावरन चालणे शक्य होत नाही. या फेरीवाल्यांवर पालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असली तरी पथक माघारी फिरताच फेरीवाले पुन्हा ठाण मांडून बसतात. यावर तोडगा म्हणून केंद्र शहसनाने फेरीवाला धोरण योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत शहरातील वर्दळ वसलेले रस्ते निश्चित करून त्याठिकाणी फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे धोरण होते. परंतु हे धोरण गेले अनेक वर्षे कागदावरच असल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिकेने २०१९ मध्ये सर्वेक्षण केले होते. त्यात शहरात केवळ ६ हजार फेरीवाले असल्याची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी केवळ २ हजार फेरीवाल्यांनी आपले कागदोपत्री पुरावे प्रशासनाकडे जमा केले असल्याचा दावा प्रशासनाने त्यावेळी केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर असलेले केंद्र शासनाचे फेरीवाला धोरण राबविण्यासाठी पालिकेने ठोस पाऊले उचलली आहेत. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे फेरीवाला धोरण राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शहरात फेरीवाल्यांची संख्या १ हजार २३० च्या आसपास असल्याचे समोर आले आहे. या फेरीवाल्यांची पहिली यादी पालिकेने जाहीर केली आहे. या यादीत नावात किंवा इतर काही बदल असतील तर १२ ऑगस्ट पर्यंत ते बदल करुन घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. या प्रक्रियेनंतर १० ते १२ दिवसात हरकती आणि सुचना घेतल्या जाणार असून त्यानंतर फेरीवाल्यांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. ही यादी प्रसिध्द झाल्यानंतर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिका फेरीवाल्यांची निवडणुक घेण्यात येणार आहे. यातून असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. फेरीवाल्यांमध्ये एकमत होत नसल्याने पालिकेकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
ठाणे शहरातील १ हजार २३० फेरीवाल्यांची यादी अंतिम करताना पालिकेच्या माध्यमातून पुन्हा फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामध्ये नियमानुसार पुरावे सादर करणाऱ्यांचा यादीत समावेश केला जाणार आहे. फेरीवाला धोरण अंतिम करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न आहेत. त्यानुसार ही पहिली यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानंतर ऑगस्ट महिना अखेर हरकती आणि सुचनावर सुनावणी घेऊन यादी अंतिम केली जाणार आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर निवडणुक घेऊन असोसिएशनची स्थापना केली जाणार आहे.
जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त, ठाणे महापालिका