Thane Municipal Corporation : ठाणे : ठाणे महापालिका आस्थापनेवरील प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा आदी सेवांमधील एकूण १७७३ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांच्या भरतीसाठी २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत पालिकेने दिली होती. मात्र, काही कारणास्तव पालिकेने ही मुदत वाढविली असून यामुळे आता १७ सप्टेंबपर्यंत इच्छूकांना भरतीसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत.

ठाणे महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली असून ही ‘ब’ वर्ग महापालिका आहे. ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह ९०८८ तर परिवहन सेवेत २ हजार ६०० कर्मचारी आहेत. तसेच २५०० कंत्राटी कामगार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार इतकी आहे. ही लोकसंख्या आता २६ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही वर्षात पालिका क्षेत्राचे विस्तारीकरण झाले आहे.

परंतु या नागरिकांना मूलभूत सेवासुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने आकृतीबंधमध्ये ८८० वाढीव पदांना मंजुरी दिली. पण, ही भरती काही कारणास्तव होऊ शकलेली नव्हती. त्यातच अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळेच पालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यानेच सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा दुहेरी ताण वाढला होता. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने रिक्त पदांकरीता भरती प्रक्रीया राबविण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी २ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदत दिली होती.

या पदांसाठी भरती

अग्निशमन विभागात सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी १३, चालक,यंत्रचालक २०७ आणि अग्निशमन जवान ३८१ अशी ६०१ पदे भरली जाणार आहेत. आरोग्य विभागात परिचारीका ४५७, प्रसाविका ११६, ज्युनिअर टेक्नीशियन ६०, दवाखाना आया ४८, वॉर्डबॉय ३७, मॉरच्युरी अटेंडन्ट २८, शस्त्रक्रिया सहाय्यक २५, मल्टी पर्पज वर्कर ३३, सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ, लॅबोरेटरी अटेंडन्ट, न्हावी, अटेंडन्ट, ब्लड बँक टेक्निशिअन, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, मेडिकल रेकॉर्ड ऑफीसर, फिजीसिस्ट, औषध निर्माण अधिकारी, डायटीशीअन, लिपीक, सहाय्यक परवाना निरिक्षक यासह तब्बल ६५ प्रकारांची पदे भरली जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता १ (नागरी) २४, कनिष्ठ अभियंता १ ( यांत्रिक ) १६, कनिष्ठ अभियंता (विद्युत) ४, कनिष्ठ अभियंता २ – ६३ पदे भरली जाणार आहेत.

मुदतवाढीचे कारण..

ठाणे महापालिकेने आता रिक्त पदांकरीता भरती प्रक्रीया राबविण्याचा निर्णय घेतला असून यानुसार, सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन आणि आरोग्य विभागात एकूण १७७३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी १२ ऑगस्टपासून अर्ज मागविण्यास सुरूवात केली होती. २ सप्टेंबपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी आणि त्याआधीही काही तांत्रिक कारणामुळे अनेकांना अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यामुळे पालिकेने अर्ज दाखल करण्यासाठी आता आणखी १५ दिवसांची मुदत वाढ देऊन १७ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्यास वेळ दिली आहे.