Thane Municipal Corporation launches various new schemes for women and transgender individuals.: ठाणे : ठाणे महानगरपालिकेचा समाजविकास विभाग तसेच महिला व बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून महिला आणि तृतीयपंथीयांसाठी विविध नवीन कल्याणकारी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ ठाणे महापालिका क्षेत्रातील पात्र नागरिकांना मिळणार असून, पात्र लाभार्थ्यांनी निश्चित मुदतीत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिकेचा समाजविकास विभाग तसेच महिला व बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून महिला आणि तृतीयपंथीयांसाठी दरवर्षी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यंदाही या विभागांकडून विविध नवीन योजना राबविल्या जाणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, आणि तृतीयपंथीय समाजाचा सामाजिक सहभाग वाढवणे हा आहे. विशेषत: उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी या योजना उपयुक्त ठरणार आहेत.

तृतीयपंथीयांसाठी योजना

महापालिकेच्या समाजविकास विभागाने तृतीयपंथीय व्यक्तींकरिता आर्थिक सहाय्य योजना राबविण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र तृतीयपंथीय व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच महिला व बालकल्याण विभागाने महिलांसाठी आणि मुलींसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत.

महिला व बालकल्याणासाठी योजना

कचरावेचक महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य (वय १८ वर्षांपर्यंत) करणे. विधवा, घटस्फोटीत महिलांच्या मुलींच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य करणे. ठाणे महापालिका शाळेतील इयत्ता १० वीमध्ये ७० टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अर्थसहाय्य करणे. मुली तसेच महिला खेळाडूंसाठी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती योजना. दुर्धर आजाराने ग्रासलेल्या महिलांसाठी (एचआयव्ही, कॅन्सर, डायलिसिस, अर्धांगवायू इ.) उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे. एकल, विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी योजना. ६० वर्षांवरील विधवा, घटस्फोटीत ज्येष्ठ महिलांसाठी उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे. नोंदणीकृत महिला बचत गटांना अनुदान देणे ( किमान एक वर्ष झालेले बचत गट ). मुलगी जन्माला आल्यावर तिच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत करणे. पहिल्या किंवा दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना अर्थसहाय्य देणे. ठाणे महापालिकेतील स्थायी व कंत्राटी सफाई कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य योजना (इयत्ता १ ली ते पदवीपर्यंत). अशा एकूण १४ योजना महिला व बालकल्याणासाठी एकूण राबविण्यात येणार आहेत.

अर्ज कधी व कसे करायचे,

या सर्व योजना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांसाठी उपलब्ध असून, अर्ज सादरीकरणाची मुदत ६ ते २१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. सर्व योजना अर्ज प्रभाग समिती कार्यालयात उपलब्ध असून, पात्र लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात वरील योजनेचे अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. विहित कालावधीत परिपुर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रासह सबंधित प्रभाग समिती कार्यालयात स्विकारण्यात येतील. अर्ज सादर केल्यानंतर त्यांची छाननी आणि मंजुरी संबंधित समितीकडून केली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी नागरिकांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला http://www.thanecity.gov.in भेट द्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.