Thane election News : ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना शनिवारी प्रशासनाने जाहिर केली आहे. प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात २६९ तक्रारी दाखल झाल्या असल्या तरी, लोकमान्यनगर (प्रभाग क्रमांक ६), पवारनगर (प्रभाग क्रमांक ५) वगळता उर्वरित प्रभागांची रचना ‘जैसे थे’च ठेवण्यात आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. नगर विकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या या रचनेनुसार, एकूण ३३ प्रभागांमधून १३१ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. नगरसेवक किंवा प्रभाग संख्येत बदल झाला नसला तरी दिवा परिसरात मात्र, एक नगरसेवक वाढल्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी २२ ऑगस्ट रोजी प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. नागरिकांच्या हरकती आणि सूचना स्वीकृत करून त्यावर १० सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली होती. नगर विकास विभागाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी संजय सेठी यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली होती. प्राप्त हरकती आणि सूचनांचा सांगोपांग विचार करुन सेठी यांनी त्यांचा अभिप्राय नमुद केला होता.

सेठी यांनी दिलेल्या अभिप्रायांच्या अनुषंगाने आवश्यक ते बदल करून प्रभाग रचनेचा अंतिम प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पालिकेने १५ सप्टेंबर रोजी अंतिम प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव तपासून नगर विकास विभागाने तो राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केला होता. त्यास निवडणुक आयोगाने १ ऑक्टोबर रोजी अंतिम मंजुरी दिली. आता अंतिम प्रभाग रचनेवर कोणतीही हरकत, सूचना किंवा त्या अनुषंगाने सुनावणी नियमानुसार घेण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तक्रारी २६९ पण, बदल एकाच ठिकाणी

ठाणे महापालिका प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात २६९ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यावर १० सप्टेंबर रोजी ठाणे महापालिका मुख्यालयातील कै नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी व राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली होती. या सुनावणीस शिंदेची शिवसेना वगळता शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती लावून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना केल्याचा आरोप केला होता. तर, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनीही काही प्रभागांबाबत हरकती यावेळी नोंदविल्या होत्या. असे असले तरी अंतिम प्रभाग रचनेत लोकमान्यनगर (प्रभाग क्रमांक ६) रामबाग परिसर काढून तो पवारनगर (प्रभाग क्रमांक ५) मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हे दोन प्रभाग वगळता उर्वरित प्रभागांची रचना ‘जैसे थे’च ठेवण्यात आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

नगर विकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या या रचनेनुसार, एकूण ३३ प्रभागांमधून १३१ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. करोनामुळे यंदा जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे २०११ च्या जणगणनेनुसार प्रभाग रचना आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नगरसेवक संख्येत वाढ झालेली नाही. यात चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत ५० ते ६२ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. तर, तीन सदस्यांचा प्रभाग ३८ हजार लोकसंख्येचा करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक २९ हा तीन सदस्यांचा होता. यंदाही तेच कायम ठेवण्यात आले आहे.