ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे शहरातील अनेक परिसर जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या साहित्याचे नुकसान झाले होते. गुरूवारी शहरात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, शहरात पावसानंतर आता खड्डेसंकट उभे राहिले आहे. या खड्डे प्रवासामुळे नागरिक हैराण झाले असून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन्ही दिवशी शहरात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला होता. या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी देण्यात आली होती. तीन दिवस पावसाचा जोर वाढला होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक परिसर जलमय झाले होते. अनेकांच्या घरात पाणी शिरून त्यांच्या साहित्याचे नुकसान झाले होते. पाऊस जास्त प्रमाणात पडला नसला तरी अनेक परिसर जलमय झाले असून त्यामागे विविध प्रकल्पांची कामेच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. बुधवार रात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाला असून यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
गुरूवारी शहरात पाऊस सुरू असला तरी सतत पाऊस पडत नव्हता. तसेच पावसाचा जोरही कमी होता. असे असले तरी गेले तीन दिवस पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक मार्गांवर खड्डे पडले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातून घोडबंदर मार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्ग जातो. हे दोन्ही मार्ग वाहतूकीसाठी महत्वाचे मानले जातात. या मार्गावरून अवजड वाहतूकीबरोबरच स्थानिक नागरिकांच्या वाहनांची वाहतूक सतत सुरू असते. सतत वर्दळीच्या या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांचे आकारही मोठे असल्याने वाहने त्यात आदळत आहेत. तीन हात नाका ते माजिवाडा उड्डाण पुल आणि माजिवाडा उड्डाण पुल ते भाईंदर पाड्यापर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्डे प्रवासामुळे नागरिक हैराण झाले असून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नवीन उड्डाण पुलाखालील रस्ते खड्डेमय
घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कासारवडवली आणि ओवळा भागात दोन नवे उड्डाण पुल उभारण्यात आले आहेत. या पुलांवरील रस्ते सुस्थितीत असले तरी, या पुलाखाली असलेल्या रस्त्यांवर मात्र मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने ते चालकांना रात्रीच्या वेळेस दिसून येत नाही. यात वाहने आदळत आहेत.