डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांनी हळूहळू रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या आत घुसखोरी सुरू केल्याने, फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी या फेरीवाल्यांंसह फडके रस्ता, नेहरू रस्ता, बाजीप्रभू चौक परिसरातील फेरीवाल्यांवर शनिवारी कारवाई केली. फेरीवाल्यांचे सामान जप्त करून पुन्हा रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय केला तर गुन्हे दाखल करण्याची तंबी दिली.
यावेळी पदपथ अडवून दुकानासमोर साहित्य, कपडे लावणाऱ्या दुकानदारांंचे सामान या कारवाईत जप्त करण्यात आले. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईने फेरीवाल्यांची दाणादाण उडाली. डोंंबिवली पूर्व रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या आत एकही फेरीवाला बसणार नाही याची काटेकोर अंमलबजावणी फ प्रभाग फेरीवाला पथकाकडून नियमित केली जाते. नेहरू रस्ता भागात सीमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे या भागात नागरिक, वाहनांची दररोज कोंडी होते. नेहरू भागात रस्ते काम सुरू असल्याने या रस्त्यावर दीडेश मीटरच्या बाहेर बसणाऱ्या काही फेरीवाल्यांंनी हळूहळू आपले व्यवसाय दीडेश मीटरच्या आत, फडके रस्ता, पाटकर रस्ता, बाजीप्रभू चौक भागातील रस्ते, चौक, पदपथ अडवून सुरू केले होते.
याविषयीची माहिती समजताच फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांंनी पथक प्रमुखांसह आपला मोर्चा फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, नेहरू रस्ता भागात वळविला. दीडशे मीटरच्या आत आणि बाहेर पदपथ, रस्ते अडवून बसणाऱ्या फळ, भाजीपाला विक्रेते, फूल विक्रेते यांच्यावर कारवाई केली. अचानक सुरू झालेल्या या कारवाईने फेरीवाल्यांची पळापळ झाली. पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाने फेरीवाल्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांचे सामान जप्त केले.
रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या बाहेर तुम्हाला व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली आहे. म्हणून तुम्ही रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करू शकत नाहीत. त्या भागाचा सात बारा उतारा तुमच्या नावावर करण्यात आलेला नाही, अशी तंबी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी फेरीवाल्यांना सामान जप्त करताना दिली. रस्ते, पदपथ नागरिकांना मोकळे पाहिजेत. यासंदर्भात कोणतीही तक्रार नागरिकांकडून पालिकेत येता कामा नये, असे आयुक्त अभिनव गोयल यांचे अधिकाऱ्यांंना आदेश आहेत.
फेरीवाला हटाव पथक, सुरक्षा रक्षक यांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जप्त करण्यात आलेले नाशिवंत सामान जाळून टाकण्यात आले. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. जे फेरीवाले दीडशे मीटरच्या आत, रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करत असल्याचे आढळून आले तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असे
साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सांगितले.