राज्यभरात भोंग्यांवरून राजकारण तापलेले असतानाचा ठाणे पोलिसांनी शहरातील ध्वनिक्षेपक विक्रेते, दुकानदारांना ध्वनिक्षेपक तसेच त्यासंबंधीचे साहित्य खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची वैयक्तिक माहिती घेऊन जवळील पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोणत्याही धार्मिक स्थळापासून २०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव, घोषणाबाजी, गायन, वाद्य वाजविणे, विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर, रॅली, मिरवणूका आणि सभा घेण्यास २७ जूनपर्यंत ठाणे पोलिसांतर्फे बंदी घालण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यभरात धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांवरून मोठे वादंग सुरु आहे. काही नेतेमंडळींकडून धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या भोंग्यांना विरोध दर्शविल्याने अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्रही दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच ध्वनीक्षेपणाच्या वापरामुळे ध्वनीप्रदुषणात वाढ होत असल्याने ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सर्व ध्वनिक्षेपक विक्रेते, दुकानदार, आस्थापना यांनी त्यांच्याकडून ज्या ग्राहकाने ध्वनिक्षेपक किंवा त्या संबंधीचे साहित्य खरेदी केले असेल त्या संबंधित व्यक्तीची माहिती जवळील पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असल्याचे निर्देश विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.सुधाकर पठारे यांनी दिले आहेत.

यामध्ये विक्रेत्यांना ध्वनिक्षेपक खरेदी करणाऱ्या ग्राहकाचे नाव, पत्ता, ओळखपत्र, आधारकार्ड, संपर्क क्रमांक, वीज देयक यांची तपासणी करून तसेच खरेदी केलेल्या ध्वनीक्षेपकांची संख्या आणि कोणत्या उद्देशाने खरेदी केले आहे, याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे आयुक्तालय क्षेत्रात असणाऱ्या धार्मिक स्थळापासून २०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव, घोषणाबाजी, गायन, वाद्य वाजविणे, विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर, रॅली, मिरवणूका तसेच सभा घेणे यांसारख्या गोष्टी करण्यास २७ जूनपर्यंत मज्जाव घालण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane police directs shop owners to take deatails of loudspeaker buyers sgy