ठाणे – हवामान खात्याने ऑक्टोबर अखेर पर्यंत पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, रविवारी ठाणे शहरात दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. पावसाच्या या हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
मे महिन्यात सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर संपत आला तरी थांबताना दिसत नाही. ऐन दिवाळीत देखील पाऊस कोसळला. मात्र हा पाऊस ऑक्टोबर अखेरपर्यंत कोसळण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. यंदाच्या वर्षात पूर्वमोसमी पाऊस कोसळला, नंतर मोसमी पाऊस आणि त्यानंतर उत्तर मोसमी पाऊसही सुरूच आहे.
त्यामुळे पावसाचा काळ जवळपास सहा महिने झाला आहे. यंदाचे निम्मे वर्ष पावसात गेले आहे. आणखी काही काळ याच पावसाचा सामना करावा लागणार आहे. दिवाळीनंतरही महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित झाला आहे.
गेले काही दिवसांपासून ऐन सकाळ आणि दुपारच्या वेळी कडक उन्ह पडत होते. या उष्ण वातावरणामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यांनंतर, सायंकाळच्यावेळी पावसाची एक सर येऊन जात होती. त्यानंतर पुन्हा वातावरणाता उष्णाता निर्माण होत. परंतू, रविवारी सकाळपासूनच ठाणे शहरात पावसाने हजेरी लावली. पावसाच्या हलक्या सरी दिवसभर कोसळत आहेत.
तर, वातावरण देखील मळभ झाले असून गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्या पासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ठाणे शहरात रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत ६.३४ मिमी पाऊस पडल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती विभागाकडे करण्यात आली आहे.
