ठाणे : शहरातील बाजारपेठा दिवाळीच्या खरेदीने गजबजल्या असताना, ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतींच्या आतदेखील उत्साहाचे आणि आशेचे वातावरण पसरले आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात कैद्यांनी स्वत: तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.

शहरातील बाजारपेठा दिवाळीच्या खरेदीने रंगतदार झाल्या असून सर्वत्र उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. दिवे, मेणबत्त्या, रांगोळी, फुलांची सजावट, तसेच नव्या कपड्यांनी बाजारपेठ उजळून निघाली आहे. रस्त्यावरील फूटपाथवरील दुकानेही ग्राहकांनी फुलून गेली असून दिवाळीची चाहूल सर्वत्र जाणवत आहे. या सणाच्या आनंदात ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनीही सहभागी होत दिवाळीसाठी लागणारे वस्तू स्वत: तयार केलेल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम १६ ऑक्टोबरपासून २५ ऑक्टोबरपर्यंत सुरू आहे. तुरुंगाच्या प्रवेशद्वाराजवळ या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात मेणबत्त्या, दिवे, लाकडी वस्तू, कपडे, चादरी, रुमाल, टॉवेल, आणि इतर उपयुक्त वस्तू आहेत.

या उपक्रमाचे उद्धाटन ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तुरुंग अधीक्षक राणी भोसले, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी पांचाळ म्हणाले, ठाणे कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंमध्ये कल्पकता, परिश्रम आणि गुणवत्ता दिसून येते. या वस्तू बाजारपेठेपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत आणि त्यांची गुणवत्ता उत्तम आहे. तुरुंग प्रशासनाने कैद्यांच्या वेळेचा उपयोग त्यांच्या कलाविकासासाठी केला आहे, हे कौतुकास्पद आहे. सुतीकापडापासून बनवलेले रूमाल, कपडे तसेच सजावटीच्या वस्तू हे सर्व उत्पादने आत्मनिर्भरतेचा आणि ‘स्वदेशी वापरा’चा संदेश देतात. दिव्यांची दिवाळी हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवणारा ठरेल.

उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन

तुरुंग अधीक्षक राणी भोसले म्हणाल्या, दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही दिवाळी मेळाव्याचे आयोजन केले आहे. कैद्यांनी अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू तयार केल्या आहेत. नागरिकांनी यंदाही मोठ्या संख्येने येऊन खरेदी करावी, अशी आमची अपेक्षा आहे. तुमचा प्रतिसाद हा कैद्यांच्या मनोबलाला नवी दिशा देणारा ठरेल. तसेच या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारा मोबदला कैद्यांना दिला जातो, ज्यातून ते स्वतःचे छोटे खर्च भागवू शकतात किंवा आपल्या कुटुंबियांना मदत करू शकतात. त्यामुळे समाजाने या उपक्रमाला प्रोत्साहन देणे ही एक प्रकारची सामाजिक जबाबदारी आहे.