ठाणे – ठाणे रेल्वे स्थानकातून पश्चिमेकडे येण्यासाठी असलेल्या सॅटीस पुलाच्या जिन्याच्या पायऱ्यांची दुरवस्था झाल्याचे दिसत आहे. या जिन्यावरील पायऱ्या तसेच लोखंडी पट्ट्या तुटल्या आहेत. यामुळे गर्दीच्या वेळेत घाईत असलेले प्रवासी या जिन्याच्या तुटलेल्या पायऱ्यांवर वारंवार पाय अडकून पडत आहेत.
ठाणे शहर तसेच त्यापलीकडील शहरांमधून मुंबईत कामानिमित्ताने अनेक प्रवासी प्रवास करतात. तसेच ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बरमार्गे नवी मुंबईच्या दिशेने अनेक प्रवासी जात असतात. याचबरोबर ठाण्यातील पश्चिमेस नौपाडा, वागळे इस्टेट, घोडबंदर, ढोकाळी अशा विविध भागात खासगी कार्यालयातील नोकरदार वर्ग दररोज प्रवास करतात. त्यामुळे इतर शहरातून दररोज रेल्वे मार्गे नोकरदार ठाणे शहरात येतात. यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील पश्चिमेस दररोज प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या प्रवाशांना ठाणे शहरातील अंतर्गत भागात जाण्याकरिता पश्चिमेस सॅटीस पूलावर पालिकेच्या परिवहन सेवेच्या बस गाड्यांची सुविधा आहे. तसेच सॅटीस पुलाखाली रिक्षाचा थांबा आहे.
सॅटीस पुलाखाली जाण्यासाठी दोन जिने आहेत. या दोन्ही जिन्यांवरील पायऱ्यांवर प्रवाशांना चालताना पकड बसावी यासाठी लोखंडी पट्ट्या लावण्यात आलेल्या आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून सततच्या वर्दळीमुळे लावण्यात आलेल्या अनेक लोखंडी पट्ट्या निखळलेल्या आहेत. तसेच या जिन्यांवरील अनेक फरशा तुटलेल्या अवस्थेत आहेत.
ज्या ठिकाणी फरशा तुटलेल्या आहेत तिथे पावसाचे पाणी साचते. पावसाचे पाणी साचल्यामुळे पायऱ्यांवर चिखल निर्माण होतो. यामुळे जिन्यावरून प्रवास करताना प्रवाशांना तुटलेल्या पायऱ्या निदर्शनास आल्या नाहीतर अनेक प्रवासी पाय घसरून पडत असल्याच्या घटना घडत आहेत. ज्येष्ठ नागरिक यांना याठिकाणी जिन्याच्या बाजुच्या खांबांचा आधार घेऊन चढ उतार करावी लागते. या जिन्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पालिका बांधकाम विभागाने या महत्वपूर्ण विषयात लक्ष घालण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकाजवळील जिन्यांच्या पाऱ्यांचे झालेल्या दुरावस्थेचे काम दोन दिवासांमध्ये करण्यात येईल. – प. प्रे. सोनग्रा, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे महापालिका
प्रतिक्रिया
ठाणे रेल्वे स्थानकातील पश्चिमेस सॅटीस पुलावर असलेल्या परिवहनाच्या बसगाडीने किंवा पुलाखाली असलेल्या रिक्षाने नेहमी प्रवास करते. यामुळे या पायऱ्यांवरून ये -जा नेहमी सुरू असते. या पुलावरील जिन्यांमध्ये पाय अडकल्याने अनेक वेळा ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना अडचणींचा सामना करावा लागतो. सायंकाळनंतर या ठिकाणी गर्दी असते त्यामुळे तुटलेल्या पायऱ्या निदर्शनास येत नाहीत. – विजया पानस्कर, प्रवासी