traffic in ghodbunder road today : ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहर पोलिसांनी महत्त्वाची सूचना घोडबंदर भागातून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांना दिली आहे. ठाणे आणि मिरा भाईंदर शहरात सोमवार, मंगळवार या दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने पोलिसांनी या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. जाणून घेऊया नेमके कारण काय आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते पाण्याखाली गेले असून, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी नागरिक आणि वाहनचालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार आणि मंगळवार या दोन दिवस ठाणे आणि मिरा-भाईंदर शहरात मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून, वाहतूक कोंडीचे मोठे संकट उभे राहिले आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि प्रवाशांचे मोठे हाल होणार आहे. अनेक वाहने पाण्यात बंद पडल्याने नागरिक अडचणीत सापडले आहेत.
काय म्हणाले पोलीस?
– गेल्या दोन दिवसांपासून ठाणे आणि मिरा भाईंदर शहरात मोठ्याप्रमाणात पाऊस पडत आहे. ठाणे-घोडबंदर मार्गिकेवर मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या आयुक्तालय क्षेत्रात करपे कंपाऊंड येथे मोठ्याप्रमाणात पाणी साचले असून खड्डे पडल्याने तेथील खड्ड्यांमध्ये गाड्या अडकत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथला होऊन एकमार्गिका वाहतुक सुरु होते. येथील वाहतुक कोंडीचा परिणाम हा ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कासारवडली येथील आनंद नगर नाक्यापर्यंत होत आहे. तरी नागरिकांना आवाहन केले जात आहे की, गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, विरुद्ध दिशेने वाहने चालवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.