Rainy conditions have brought relief to the students : ठाणे : जून ते सप्टेंबर या काळात सक्रिय राहणारा पावसाळा यंदा नोव्हेंबर महिन्यातही थांबायचे नाव घेत नाही. अवकाळी पावसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. थंडीच्या दिवसांत (Winter Season) सतत पडणारा पाऊस आता नकोसा वाटू लागला असला तरी या पावसामुळे काही शाळांनी विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. साधारणपणे पावसाळ्यानंतर, म्हणजेच दिवाळीच्या सुट्टीनंतर, विद्यार्थ्यांना शाळेचा संपूर्ण गणवेश आणि बूट परिधान करणे बंधनकारक असते. मात्र, पावसामुळे शाळेच्या बुटांऐवजी सँडल घालण्याची परवानगी ठाण्यातील काही शाळांनी दिल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
पावसाळा हा असा ऋतू आहे की, ज्यामध्ये वातावरणात आर्द्रता वाढते आणि ढगांमधून पाऊस पडतो. भारतात हा ऋतू साधारणतः जून ते सप्टेंबर या काळात असतो. पावसाळ्यामुळे शेती, धरण आणि जलसाठ्यांची भर होऊन जलपुरवठा सुधारतो. निसर्गही हिरवागार बनतो, नद्या-धबधबे प्रवाही होतात आणि वातावरण आनंददायी बनते. मात्र, दुसरीकडे अतिवृष्टीमुळे पूर, भूस्खलन आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो.
पावसामुळे शाळेने घेतला निर्णय
यंदा नोव्हेंबर महिना उजाडला तरी पाऊस अजून सुरूच असल्याचे चित्र आहे. या पावसामुळे नागरिक आजारी पडत आहेत तसेच थंडीच्या महिन्यात पाऊस सुरू असल्याने तो आता नकोसा वाटू लागला आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे शाळेचा गणवेश आणि बूट परिधान करणे बंधनकारक असते. मात्र, यंदाच्या उशिरा पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
बुटांऐवजी सँडल घालण्यास परवानगी
पावसामुळे शाळेच्या बुटांऐवजी सँडल घालण्याची परवानगी ठाण्यातील काही शाळांनी दिली असून काही शाळांनी तसे संदेश पालकांना पाठविले आहेत. सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांचे बूट ओले होऊन होणारा त्रास टाळण्यासाठी आणि त्यातून होणाऱ्या सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी ही तात्पुरती सूट देण्यात आली आहे. पालक आणि विद्यार्थी या निर्णयाचे स्वागत करत असून, शाळेने घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
