ठाणे : ठाण्यात सुमारे वर्षभरापासून बंद असलेली टोईंग कारवाई ठाणे शहरात पुन्हा एकदा सुरु झाली आहे. वाहतुक पोलिसांकडून कोपरी, वागळे इस्टेट आणि कासारवडवली भागात ही टोईंग सुरु झाली असून येत्या काही दिवसांत टप्प्या-टप्प्याने इतर भागातही टोईंग कारवाई सुरु केली जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना पुन्हा एकदा टोईंग कारवाईच्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात रस्त्याकडेला बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या दुचाकींवर ठाणे पोलिसांकडून टोईंग वाहनांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. टोईंग वाहनांच्या कंत्राटदारांकडून अनेकदा नियमबाह्य पद्धतीने वाहने उचलली जातात. त्यामुळे टोईंग वाहनांवर काम करणारे कर्मचारी आणि दुचाकी चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवितात. अनेकदा हे प्रकरण शिवीगाळ आणि हाणामारी पर्यंत येत असते.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील टोईंग व्हॅनचे करार दरवर्षी केले जातात. आयुक्तालय क्षेत्रात अशापद्धतीने सुमारे ३० टोईंग वाहने सुरु होती. या वाहनांचा टोईंग वाहनांचा करार नोव्हेंबर २०२४ मध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सुमारे महिनाभर त्यांस मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढीची तारीख उलटल्यानंतर ठाणे स्थित अजय जेया यांनी टोईंग वाहनाद्वारे केली जाणारी कार्यपद्धती पारदर्शक नसल्याचा आरोप करत पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ठाणे वाहतुक पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात टोईंग कारवाई बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी ठाणे पोलिसांनी पुन्हा एकदा टोईंग कारवाई सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अजय जया यांनी त्यास विरोध केला. त्यानंतर इतर राजकीय पक्षांनीही त्यांना पाठींबा दिल्यानंतर ठाणे पोलिसांनी टोईंग कारवाई बंद ठेवली होती. सुमारे दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी ठाणे शहर वगळता इतर आयुक्तालय क्षेत्रात टोईंग वाहने सुरु केली होती. त्यानंतर आता टप्प्या टप्प्याने ठाण्यातही टोईंग कारवाई सुरु केली आहे. ठाण्यातील कोपरी, वागळे इस्टेट, कासारवडवली भागात सध्या ही टोईंग वाहने धावत असून येत्या काही दिवसांत इतर भागातही ही वाहने सुरु केली जाणार आहे.
ठाणे शहरात अनेक भागात वाहतुक कोंडी होते. त्यामुळे नियमांचे पालन करुन ठाण्यात टप्प्याटप्प्याने टोईंग वाहनाद्वारे कारवाई केली जाणार आहे. – पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.
ठाणे शहरात नियमबाह्य पद्धतीने वाहने उचलली जात आहे. लवकरच हे सर्व प्रकार मी उघड करणार आहे. – अजय जया, तक्रारदार.
एका कामानिमित्ताने कार्यालयात गेलो असता, अवघ्या काही मिनीटांच्या आत माझ्या दुचाकीवर कारवाई करण्यात आली. टोईंग करुन वाहन नेल्यानंतर तेथे पोहचेपर्यंत १०० रुपये खर्च झाले. त्यानंतर टोईंगचे २०० आणि दंड ५०० रुपये असा एकूण ८०० रुपयांचा भुर्दंड पडला. वाहन केव्हा उचलून नेले हे देखील कळले नाही. प्रशासनाने कारवाई करायची असल्यास वर्तकनगर भागात शाळांच्या प्रवेशद्वारा बाहेर होणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. या वाहनांमुळे प्रशस्त रस्त्यावर वाहतुक कोंडी होते. परंतु तेथे पोलिसांकडून कारवाई होत नाही. – संतोष निकम, वाहन चालक.