ठाणे – ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शहर व उपनगरांमध्ये भिंत कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनांमध्ये अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशीच एक घटना बुधवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील वागळे इस्टेट भागात असलेल्या एका कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली. ही सुरक्षा भिंत कंपनी शेजारी उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर पडली. यामुळे तब्बल ९ वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
दरवर्षी पावसाळ्यात भिंत कोसळणे तसेच वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येतात. यासाठी ठाणे महापालिकेकडून धोकादायक इमारती, वृक्ष यांची यादी तयार केली जाते, मात्र अनेकवेळा त्यावर त्वरित कारवाई होत नाही. अनेक भिंती जुन्या असून त्यांची देखभाल केली जात नाही. परिणामी, पावसाचे पाणी भिंतींमध्ये झिरपून त्यांची संरचना कमकुवत होते आणि कोसळण्याचे प्रमाण वाढते.
बुधवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास वागळे इस्टेट भागातील रामनगर परिसरात असलेल्या बॉम्बे ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या सुरक्षा भिंतीचे काम सुरू होते. या कंपनीची भिंत अंदाजे ९५ फूट लांब व १२ फूट उंच होती. या सुरक्षा भिंतीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर परिसरातील नागरिक वाहने उभी करतात. अशाच प्रकारे बुधवारी नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली होती. मात्र, कंपनीच्या सुरक्षा भिंतीचे काम सुरू असताना कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांवर कोसळली.
या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी तब्बल ९ वाहनांचे या घटनेत नुकसान झाले आहे. यामध्ये ७ दुचाकी आणि २ रिक्षांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच, श्रीनगर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, वागळे प्रभाग समितीचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घडलेल्या घटनेच्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने धोकापट्टी लावून बॅरिगेटिंग करण्यात आले.
वागळे इस्टेट भागात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग तसेच विविध खासगी कार्यालये आहेत. यामुळे ठाणे शहरासह त्यापलीकडील शहरांमधून अनेक नागरिक येत असतात. असे असताना देखील या भागात अनेक घटना घडत आहेत. नुकतेच दोन दिवसापुर्वी वागळे इस्टेट मधील एका भागात घराची भिंत नाल्यात कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता दुसरी घटना उघडकीस आली आहे.