ठाणे : दिवाळीच्या काळात शहरात आग लग्नाचे सत्र सुरूच असून बुधवारी, दिवाळी पाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात आठ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. शहरातील कोलशेत, सावरकर नगर, कळवा, माजिवडा आणि ढोकाळी परिसरात या घटना नोंदल्या गेल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र काही ठिकाणी किरकोळ साहित्य, डेकोरेशन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

पहिली घटना मंगळवारी मध्यरात्री १२.१३ वाजता कोलशेतमधील लोढा अमरा या उंच इमारतीत घडली. इमारतीला लावलेल्या सेफ्टी नेटला आग लागली होती. बाळकुम अग्निशमन केंद्राच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग काही मिनिटांत विझवली. दुसरी घटना सायंकाळी ८.४७ वाजता सावरकरनगर येथील शिवानंद अपार्टमेंटमध्ये घडली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीत ठेवलेल्या लाकडी कपाट आणि कपड्यांना आग लागली होती. वागळे इस्टेट अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पोहोचून ती आग आटोक्यात आणली.

तिसरी घटना रात्री ९.२७ वाजता कळवा येथील सायबा हॉलमध्ये घडली. हॉलमधील डेकोरेशन साहित्य, चार एसी, लाकडी टेबल, कार्पेट व मंडप सामग्री जळून खाक झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने व कळवा अग्निशमन केंद्राच्या दलाने आग सुमारे अर्ध्या तासात विझवली.चौथी घटना रात्री ९.३५ वाजता लोढा लक्झुरिया, माजिवडा परिसरात नोंदवली गेली. येथे उघड्या जागेत साचलेल्या कचऱ्याला आग लागली होती. बाळकुम अग्निशमन केंद्राच्या पथकाने वाहनासह धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

पाचवी आणि सहावी घटना दोन्ही ढोकाळी येथील रुणवाल आयरीन संकुलात घडल्या. रात्री ९.४० वाजता, २१व्या मजल्यावरील बंद घरात ठेवलेले रद्दी कागद, प्लास्टिक व विविध साहित्य पेटले. त्यानंतर ९.४५ वाजता, त्याच संकुलातील ३५व्या मजल्यावरील खिडकीत ठेवलेल्या लाकडी भुसा आणि तुकड्यांना आग लागली. दोन्ही ठिकाणी वागळे अग्निशमन केंद्राच्या दलाने त्वरित कारवाई करून आग विझवली. सातवी घटना माजिवडा येथील लोढा लक्झुरिया संकुलाजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागल्याची होती. या घटनेमुळे काही काळ परिसरात धूर पसरला, मात्र ल सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.

आठवी घटना बुधवारी पहाटे १.२८ वाजता वागळे इस्टेट येथील अय्यप्पा मंदिराजवळ घडली. एका ऑटो रिक्षामधून अचानक सीएनजी गळती सुरू झाली होती. अग्निशमन दलाने व्हॉल्व बंद करून गळती थांबवली आणि मोठा अपघात टळला. दिवाळी पाडव्याच्या दिवशी घडलेल्या या सलग घटनांमुळे ठाण्यात अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांनी सणासुदीच्या काळात काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.