अंबरनाथचे शिवमंदिर परिसर विकसित करण्यात अपयश; मलंगगडावरील फेनिक्युलर ट्रेन अजूनही सुरू नाही

ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांमध्ये पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठी महापालिकांनी विविध प्रकल्पांची आखणी केली होती. ठाणे महापालिकेचे विविध प्रकल्प पूर्णत्वास आले असून काही प्रकल्पांची कामे सुरू आहेत, तर कल्याण-डोंबिवली शहरांतील पर्यटनासंबंधीचे सर्वच प्रकल्प कागदावरच असल्याचे चित्र आहे. अंबरनाथमधील शिलाहारकालीन शिवमंदिर परिसर विकसित करण्यात अद्याप यश आलेले नाही. तसेच मलंगगडावरील फेनिक्युलर ट्रेन अजूनही सुरू झालेली नाही.

ठाणे शहरातील पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठी महापालिकेने विविध प्रकल्पांची आखणी केली होती. त्यापैकी मानपाडा येथे थीम पार्क, कावेसर येथील ट्रॅफिक पार्क, जैवविविधता उद्यान, अर्बन जंगल या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तर कोलशेत परिसरातील २२ एकर जागेत सेंट्रल पार्क, पोखरण-२ येथील दीड एकर जागेवर कम्युनिटी पार्क, ब्रह्मांड परिसरातील ३० एकर जागेवर नॉर्दन पार्क उभारण्याचे काम सुरू आहे. जुने ठाणे-नवीन ठाणे आणि बॉलीवूड पार्क हे दोन प्रकल्प वादग्रस्त ठरले असून बॉलीवूड प्रकल्पाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. या दोन्ही प्रकल्पांची चौकशी सुरू आहे. ठाणे शहराला लाभलेल्या खाडीकिनारी भागाचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. मात्र सीआरझेड नियमावलीच्या कचाटय़ात हा प्रकल्प अडकला होता. काही महिन्यांपूर्वीच संबंधित विभागाने प्रकल्प राबवण्यास हिरवा कंदील दाखविल्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. गायमुख चौपाटीचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. तसेच पारसिक खाडीकिनारी चौपाटी विकसित करण्याचे काम सुरू असून महापालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात मात्र पर्यटन विकसित करण्यासाठी विविध प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. काही प्रकल्पांसाठी राज्य शासनाने निधी देण्याची घोषणा केली. काही प्रकल्पांसाठी निधीही उपलब्ध झाला, मात्र घोषणा करण्यात आलेल्या एकही प्रकल्प मार्गी लागू शकलेला नाही.

मुरबाड विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध पर्यटनाची स्थळे आहेत. माळशेज घाट, नाणेघाट, बागेश्वरी, बारावीचे जंगल, बारवी धरण, बदलापूर जवळचे कोंडेश्वर, मुळगावजवळचे खंडोबा मंदिर अशी अनेक पर्यटनस्थळ आहेत. त्यांचा विकास सध्या केला जात आहे. माळशेज घाटात काचेचा पूल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

थितबी येथे निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यात आले आहे. बदलापूरजवळच्या कोंडेश्वर येथे पर्यटकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रस्ते, संरक्षक भिंती जाळ्या, आसन व्यवस्था करण्यात आली आहे. तर मुळगाव येथील खंडोबा मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. बारवी धरणक्षेत्रात बारवी जंगल सफारी सुरू करण्यात आली. मात्र त्याचे काम काही अंशी रखडले आहे. बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगल्या पद्धतीने पर्यटकांसाठी आकर्षित करणारे स्थळ निर्माण करता येऊ  शकतात. शहापूर तालुक्यात माहुली गड ट्रेकर्स आणि गडप्रेमींसाठी महत्त्वाचा आहे. सध्या येथे सांस्कृतिक केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

घोषणा कागदावर

  • ठाणे येथील येऊर परिसरात निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यात येणार होते. मात्र वनविभागाची परवानगी मिळाली नसल्यामुळे हा प्रकल्प कागदावरच आहे.
  •   कल्याण-डोंबिवलीत १० वर्षांपूर्वी शहरातील नागरिकांना मनोरंजन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तारांगण उभारण्याची घोषणा केली होती. ही घोषणा हवेत विरली आहे.
  •   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांगण उभारणीसाठी पाच कोटींचा निधी पालिकेला देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या प्रकल्पासाठी पालिकेला अद्याप जागेचा शोध घेता आलेला नाही.
  •   मागील वर्षी पालिका अर्थसंकल्पात ५० लाख खर्चून युथ पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र निधीअभावी हा प्रकल्प लालफिती अडकला आहे.
  •   नेतिवली टेकडी येथे क्रांतीवीर वासुदेव फडके यांचे निवासस्थान होते. या ठिकाणी पर्यटनस्थळ विकास करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. त्यासाठी ५० लाखांची तरतूद आहे. मात्र हा प्रकल्प अजूनही प्रत्यक्षात उतरू शकलेला नाही.
  •   तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दुर्गाडी रेतीबंदर खाडीकिनारा विकासासाठी पालिकेला एक कोटींचा निधी दिला होता. मात्र हा प्रकल्पही कागदावरच आहे.
  •   अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिलाहारकालीन शिवमंदिर आहे. गेल्या चार वर्षांपासून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्यक्रम होतात. मात्र त्याच्या आसपासचा परिसर विकसित करण्यात अद्याप यश आलेले नाही.
  •   मलंगगडावरील फेनिक्युलर ट्रेन अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे तो प्रकल्पही रखडला आहे.