डोंबिवली : खड्ड्यांमुळे शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी

मुसळधार पाऊस आणि खड्डयांमुळे कल्याण-शिळफाटा रस्त्यावरुन वाहने संथगतीने धावत असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.

डोंबिवली : खड्ड्यांमुळे शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी
मुसळधार पाऊस आणि खड्डयांमुळे कल्याण-शिळफाटा रस्त्यावरुन वाहने संथगतीने धावत असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे

मुसळधार पाऊस आणि खड्डयांमुळे कल्याण-शिळफाटा रस्त्यावरुन वाहने संथगतीने धावत असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. या रस्त्याच्या काही भागात अद्याप काँक्रीटीकरण करण्यात आले नाही. या भागात सर्वाधिक खड्डे आणि पावसाचे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी होत आहे, असे प्रवासी आणि तैनात वाहतूक पोलिसांनी सांगितले.

काटई टोल नाक्याच्या ठिकाणी टोल नाक्याचे निवारे होते. ते तीन महिन्यापूर्वी काढण्यात आले. याठिकाणचे काँक्रीटीकरणाचे काम अद्याप करण्यात आले नाही. या भागात सर्वाधिक खड्डे पडले आहेत. निळजे उड्डाण पुलावर जाण्यापूर्वीच खड्डयातून जावे लागत असल्याने वाहनांचा वेग मंदावतो. त्यामुळे पुलावर आणि पुलाच्या बाजुच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. याशिवाय निळजे, काटई, आगासन, घारिवली, भोपर भागातून वाहन चालक शिळफाटा रस्त्यावर येण्यासाठी वाहने मध्येच घुसवितात. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहन कोंडीत आणखी भर पडते, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.
काटई-बदलापूर रस्त्याच्या कोपऱ्यावर ते पलावा चौकापर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. वाहतूक पोलिसांनी तात्पुरत्या स्वरुपात हे खड्डे बुजविले होते. वाहनांची वर्दळ अधिक असल्याने ते पुन्हा उखडले आहेत. गेल्या काही दिवस पावसाने उघडीप दिली. त्याचवेळी हे खड्डे राज्य रस्ते विकास महामंडळाने भरणे आवश्यक होते. तेही या कामाकडे लक्ष देत नसल्याचे समजते. दोन दिवसापूर्वीच स्थानिक आ. प्रमोद पाटील यांनी खड्ड्यांवरुन शासनाला लक्ष्य केले आहे.कोंडीचा शालेय बस, रुग्णवाहिका चालकांना सर्वाधिक फटका बसत आहे.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून प्रवाशांना दिलासा देण्याच्या सूचना केल्या आहेत. संबंधित रस्ते कोणाच्या हद्दीतील याचा विचार करू नका. अशा सूचना प्राधिकरणांना दिल्या आहेत. शिळफाटा रस्ता कल्याण डोंबिवली पालिकेच्या अखत्यारित येतो. पण हा रस्ता एमएसआरडीसीच्या अंतर्गत येत असल्याने आपल्या हद्दीतून जात असलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी शिळफाटा रस्त्यावरील खड्डे बुजवावेत असेही कडोंमपाला वाटत नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

शिळफाटा रस्त्यावरील कोंडीमुळे दुपार पासून प्रवासी संथगतीने या मार्गावरुन प्रवास करत आहेत. या कोंडीत संध्याकाळी कामावरुन परतणारे प्रवासी अडकले. शिळफाटा ते मानपाडा पर्यंत येण्यासाठी एक ते दीड तास लागत होता. काटई नाका ते मानपाडा, सोनारपाडापर्यंत संध्याकाळी वाहतूक कोंडीमुळे वाहनांचा रांगा लागल्या होत्या.

शिळफाटा रस्त्यावरील खड्डे आणि वाहन कोंडीचा विचार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडोंमपा, एमएसआरडीसीला कठोर आदेश देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Traffic jam on shilphata road due to potholes amy

Next Story
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासातील अडथळे दूर होण्याची चिन्हे
फोटो गॅलरी