कल्याण : ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या घोडबंदर, शिळफाटा, काटई बदलापूर रस्ते महामार्गावरील माल वाहतूक करणारी अवजड वाहतूक सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत अशी १८ तास बंद करण्याचा आदेश वाहतूक विभागाने काढल्याने माल वाहतूकदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अठरा तासानंतर शहराच्या वेशीवरील ही वाहन जेव्हा मुख्य रस्त्यावर येतील त्यावेळी वाहतूक कोंडी होणार नाही का. अठरा तासात शहरांच्या मुख्य प्रवेशद्वारांवर अवजड वाहनांच्या रांगा लागून त्या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण असेल, असे प्रश्न माल वाहतूकदारांनी उपस्थित केले आहेत.
माल वाहतूक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागातील वाहने विविध भागातील तयार, कच्चा माल घेऊन दररोज धावत असतात. पक्का, कच्चा माल वेळेत पोहचणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत ही वाहने अठरा तास ठाणे, मुंबई, कल्याण, शहापूर, मुरबाड, बदलापूर, कर्जत शहरांच्या वेशीवर वाहतूक विभागाने थोपवून धरली तर मोठे पेचप्रसंग निर्माण होणार आहेत.
मुंबईच्या वेशीवरील ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, अंबरनाथ, डोंबिवली, भिवंडी, सरवली, रायगड जिल्ह्यातील तळोजा या महत्वाच्या औद्योगिक वसाहती आहेत. शेकडो वाहने दररोज या औद्योगिक वसाहतींमध्ये कच्चा, पक्का माल घेऊन धावत असतात. उत्पादन प्रक्रियेसाठी माल वेळेत पोहचणे आवश्यक असते. माल वेळेत आला नाहीतर उत्पादक उद्योजकांचे कोट्यवधीचे नुकसान होते. धान्यसदृश्य माल वेळेत पोहचणे आवश्यक असते. मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात हा माल भिजला तर त्याचे खापर विक्रीदार, खरेदीदार वाहतूकदारावर फोडतात. तो भुर्दंड अनेक वेळा वाहतूकदाराला बसतो. हे सर्व प्रश्न या अवजड वाहन बंदीच्या माध्यमातून निर्माण होणार आहेत, असे माल वाहतूकदारांनी सांगितले.
एका अवजड वाहनावरील चालक, साहाय्यक यांचे वेतन आणि वाहनाचा देखभाल खर्चाचा विचार केला तर माल वाहतूकदार एका वाहनासाठी दर महिन्याला दीड ते दोन लाख खर्च करतो. खड्ड्यांमुळे वाहनांचे सर्वाधिक नुकसान होते. वाहनाचा एखादा सुट्टा भाग तुटला तर त्यासाठी १५ ते २५ हजार रूपये तयार ठेवावे लागतात. या गोष्टींचा विचार अवजड माल वाहतूक बंद करताना वाहतूक विभागाने करावा. राजकीय मंडळी आपल्या सोयीसाठी लोकांना खूष करण्यासाठी अलीकडे वाट्टेल तसे निर्णय घेतात. यामध्ये आपण अर्थव्यवस्थेला डंख लावतो याचे भान या स्वमग्न असलेल्या राजकीय मंडळींना नसते याचा विचार वाहतूक विभागाने करावा आणि घोडबंदर, शिळफाटा, बदलापूर रस्त्यावरील १८ तासाची बंदी तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी अवजड माल वाहतूकदारांनी केली आहे. एका वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले, आदेशाप्रमाणे या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी करू. ही प्रायोगिक तत्वावरील बंदी आहे. कायमस्वरूपी नाही.
ठाणे जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्र, मोठी बाजारपेठ असलेल्या भागातील अवजड माल वाहतूक अठरा तास बंद करून या भागातील उद्योजक, व्यावसायिकांच्या कोंडी बरोबर माल वाहतूकदारांची कोंडी शासन करत आहे. ही बंदी तात्काळ मागे घ्यावी. अन्यथा रस्त्यावर टायरची हवा काढून माल वाहतूकदार जागोजागी वाहने उभी करून ठेवतील. संदेश प्रभुदेसाई माल वाहतूकदार.