ठाणे : ठाणे महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या लाचेप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे. मंदार गावडे आणि संदीप पावसकर अशी दोघांची नावे असून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांची चौकशी सुरु आहे.
ठाण्यातील नौपाडा भागातील एका जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी ठाणे महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी २५ लाख रुपयांची लाच ठाण्यातील एका बांधकाम व्यवसायिकाकडून मागितली होती. संबंधित बांधकाम व्यवसायिकाने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर पथकाने पाटोळे यांना ठाणे महापालिका मुख्यालयातून ताब्यात घेतले होते. ही कारवाई महापालिकेच्या वर्धापनदिनाच्या दिवशी झाल्याने ठाणे महापालिकेतील कारभारावर पश्नचिन्ह निर्माण झाले होते. पाटोळे यांना ठाणे महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हे प्रकरण ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग केल्यानंतर पोलिसांनी पाटोळे यांच्यासह तिघांना अटक केली.
पाटोळे आणि त्यांचे दोन साथिदार सध्या जामिनावर आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपास सुरु असतानाच, बँक व्यवहार आणि काॅल तपशील तपासल्यानंतर पोलिसांनी गावडे आणि पावसकर या दोघांना अटक केली आहे. लाचेपूर्वी या दोघांनी बांधकाम व्यवसायिकाची पाटोळे यांच्यासोबत भेट घडवून आणली होती. तसेच त्यांच्या बँकेतून काही व्यवहार झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
