उल्हासनगरः वारंवार कारवाई करूनही उल्हासनगर शहरात बेकायदा पद्धतीने महिला वेटर्सच्या मदतीने ग्राहकांना आकर्षीत करत बारमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या तीन दिवसात उल्हासनगरच्या परिमंडळ चारमध्ये तीन बारवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारूनही डान्स बार मालकांकडून छमछम सुरूच ठेवली जात असल्याचे दिसून येते आहे. यावर आता पोलिस काय कठोर कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उल्हासनगर शहरात अनेक डान्स बार आजही सुरू आहेत. त्यांना दिलेल्या विहीत वेळेत आणि नियमानुसार हे चालवले जात नसल्याचा अनेकदा आरोप होतो. त्यामुळे स्थानिक पोलिसांकडून अनेकदा या बारवर कारवाई केली जाते. काही वेळा परिमंडळाबाहेरच्या पोलिसांनी, विशेष पथकांनीही या बारवर कारवाई केली आहे. स्थानिक पालिका प्रशासनाला हाताशी घेऊन पोलिसांनी बारमधील नियमबाह्य बांधकामे, अंतर्गत बदल यावरही कारवाई केली होती. अंतर्गत बांधकाम पाडण्याचे कामही करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही या बार मालकांनी नियमबाह्य कामे थांबवलेली नाहीत.
नुकतेच उल्हासनगरच्या परिमंडळ चारच्या हद्दीतील विठ्ठलवाडी आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या वतीने तीन बारवर कारवाई करण्यात आली. कॅम्प तीन भागात असलेल्या आचल बार आणि विठ्ठलवाडी येथे असलेला हंड्रेड बार या दोन बारवर पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली. दोन्ही बारमध्ये महिला वेटर्सच्या मदतीने ग्राहकांसमोर तोकडे कपडे घालून सेवा दिली जात होती. तसेच ग्राहकांसमोर अश्लील चाळे केले जात होते. त्यामुळे पोलिसांनी आचल बारमधील मालक निधी शेट्टी आणि व्यवस्थापक रविकांत त्रिपाटी यांच्यासह ३ पुरूष वेटर, १० महिला आणि इतर ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
तर हंड्रेड बारमधील बालेंद्र सिंग यांच्यासह ६ महिला आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला अश्लील चाळे आणि ग्राहकांना आकर्षीत करत असल्याचे दिसून आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ऍपल बार वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवल्याने रोहित पांडव, व्यवस्थापक दुर्गेश पांडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
या तीन गुन्ह्यांनंतर शहरातील बारमधील अश्लील कृत्ये थांबतील अशी आशा आहे. मात्र शहरात अशा प्रकारे सुरू असलेल्या बेकायदा कृत्यांवर लोकप्रतिनिधींकडून कोणताही आवाज उठवला जात नाही. त्यामुळे यांचे फावते. यावर कठोर कारवाईची मागणी केली जाते आहे.