उल्हासनगर: गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत नायजेरियन नागरिकासह पाच जणांना एम.डी. (मेफेड्रोन) अमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींकडून तब्बल २६.६१ लाख रुपये किमतीची एम.डी. जप्त केली आहे. या कारवाईमुळे मुंब्रा आणि नालासोपारा परिसराशी संबंधित असलेल्या एम.डी. अमली पदार्थ विक्री रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.

उल्हासनगरच्या गुन्हे शाखेच्या घटक चारच्या पथकाने काही दिवसांपूर्वी काटई अंबरनाथ रस्त्यावर नेवाळी गावाजवळ एका बंद धाब्याजवळ कारवाई केली होती. या कारवाईत एका महिलेला लाखो रुपयांच्या एमडी या अमली पदार्थासह अटक केली होती. तिने चौकशीत नालासोपारा येथील एका आरोपीची माहिती दिली होती. त्यानुसार हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांना आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

गुप्त माहितीनुसार, उल्हासनगर गुन्हे शाखेने पथके तयार करून विविध ठिकाणी सापळे रचले. या दरम्यान, ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या संशयितांना पकडण्यात आले. चौकशीत आरोपींची ओळख पटली असता त्यात एक नायजेरियन नागरिकाचा समावेश असल्याचे उघड झाले. उर्वरित चार जण हे स्थानिक रहिवासी असून, ते ड्रग्जचे वितरण आणि विक्रीचे काम करत होते.

पोलिसांनी तपासादरम्यान उघड केले की, या टोळीचा संपर्क मुंब्रा आणि नालासोपारा येथील मोठ्या ड्रग्ज पुरवठादारांशी होता. अटक केलेल्या आरोपींकडून एकूण २६.६१ लाख रुपये किमतीची एम.डी. ड्रग्ज जप्त करण्यात आली असून, ती तस्करीसाठी विविध भागात पोहोचवली जाणार होती. या कारवाईनंतर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या तपास पथकाकडून शहरात आणि उपनगरांमध्ये ड्रग्ज विक्रीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या सततच्या मोहिमा राबविल्या जात आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि पुरवठादारांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांच्या या कारवाईचे स्थानिकांकडून कौतुक होत असून, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी ही पावले अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.