कल्याण – उल्हासनगर चार भागातील माय अर्बन नागरी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष आणि इतर नऊ संचालक यांनी संगनमत करून आपल्या गुंतवणुकीसह इतर तीन गुंतवणुकदारांच्या एक कोटी पाच लाख रूपये रकमेचा अपहार केला आहे, अशी तक्रार उल्हासनगर मधील एक व्यावसायिकाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केली आहे.

या अपहारप्रकरणी आपण पोलीस ठाण्यात तक्रार केली तर आपण आत्महत्या करू, अशी धमकी आपणास या पतपेढीचे अध्यक्ष देत होते, असेही तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे. सन २०१८ ते जुलै २०२५ या कालावधीत हा अपहाराचा प्रकार घडला आहे.

कल्याणमधील खडकपाडा भागात राहणारे विद्युत ठेकेदार गोपाळ रख्यानी यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांचे हित आणि संरक्षण, भारतीय न्याय संहिता कायद्याने गु्न्हा दाखल केला आहे. रख्यानी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी माय अर्बन नागरी सहकारी पतपेढीचे मालक आणि अध्यक्ष प्रवीण दर्याणी, अशोक हरचंदानी, नियाती दर्याणी, प्रकाश दर्याणी, नयना दर्याणी, मेहेमोश छायेला, पुजेश गोंदाणे, हरीराम खेतवाणी, भास्कर लांगे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस ठाण्यातील तक्रारीत गोपाळ रख्यानी यांनी म्हटले आहे. माय अर्बन पतपेढीकडून गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळत असल्याची माहिती मिळाल्याने आपण उल्हासनगर चार कार्यालयात पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांंची भेट घेतली. आपणास गुंतवणुकीवर वार्षिक नऊ टक्के परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. रक्कम परत हवी असेल तर नोटीस दिल्याप्रमाणे रक्कम परत मिळेल असे सांगण्यात आले.

आपण १८ लाखाची गुंतवणूक २०१८ मध्ये केली. या रकमेवर आपणास पाच महिने चांगला परतावा मिळाला. त्यानंतर आपण कुटुंबीयांच्या नावे एकूण चाळीस लाखाची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवरील व्याज न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आपण ती रक्कम पु्न्हा ठेव रकमेत गुंतवली. या रकमेवर १२ टक्के वार्षिक दराने परतावा देण्याचे आश्वासन आपणास पतपेढीने दिले होते. आपली गुंतवणुकीची रक्कम ६२ लाख ५१ हजार आणि त्यावर १२ टक्के व्याजाने परतावा अशी रक्कम परत करण्याचे आश्वासन पतपेढी संचालकांनी आपणास दिले होते.

विहित वेळेत आपली गुंतवणूक व त्यावरील व्याज आपणास मिळत नव्हते. ही रक्कम परत देण्याचे फक्त आश्वासन पतपेढी संचालक देत होते. गुंतवणुकीची रक्कम ८८ लाख ३१ हजार झाली होती. या रकमतील १५ लाख रूपये पतपेढीने आपल्या बँक खात्यावर वळते केले. उर्वरित रक्कम देण्यासाठी आपण पाठपुरावा करत होतो. आपण रक्कम दिली नाहीतर मी पोलीस ठाण्यात तक्रार करतो असे पतपेढी संचालकांना सांगितल्यावर ते आपणास आत्महत्या करण्याची धमकी देत होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

आपली माय अर्बन पतपेढीतील उर्वरित ७३ लाख ३१ हजार आणि इतर तीन गुंतवणूकदारांची ३२ लाख ६४ हजार रूपये सतत मागणी करूनही पतपेढी संचालक मंडळाने परत केली नाही. त्यांनी आपल्या रकमेचा अपहार केला म्हणून गोपाळ रख्यानी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याप्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.