उल्हासनगर: राष्ट्रीय लोकअदालत या विशेष उपक्रमातून उल्हासनगर वाहतूक विभागाने विक्रमी यश मिळवले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करत केवळ एका दिवसात तब्बल ५३० प्रकरणांची नोंदणी करण्यात आली. या सर्व प्रकरणांमधून तब्बल १८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करून शासनाच्या खात्यात जमा करण्यात आला.
वाहतूक नियमांना पायदळी तुडवणे हे ठाणे जिल्ह्यात सर्रासपणे पहायला मिळते. त्यातही महापालिका क्षेत्रांमधील उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या उपनगरीय शहरांमध्ये वाहतुक नियमांचा बोजवारा उडालेला दिसतो. त्याचा प्रााणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. सिग्नल न पाळणे, लेन न पाळणे, काचांवर काळ्या फिल्म लावणे, कर्नकर्कश हॉर्न वाजवणे असे अनेक बेशिस्तीचे प्रकार वाहनचालक करताना दिसतात. त्यामुळे अशा वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जाते. तशी कारवाई वाहतूक पोलिसांकडून सुरूच असते. मात्र शनिवारी मोठ्या प्रमाणावर ही कारवाई करण्यात आली. यात लोकअदालत हे निमित्त होते.
शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालत अंतर्गत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून, नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रवृत्त करणे आणि शहरी वाहतुकीत शिस्त आणणे हा होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाने काटेकोरपणे ही मोहीम पार पाडली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, पोलीस हवालदार विष्णू मोगरे, पोलीस नाईक नाना आव्हाड, भारत खांडेकर, तसेच वाहतूक वार्डन राहुल ससाने यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कारवाईची ठळक वैशिष्ट्ये
या विशेष मोहिमेत तब्बल ५३० प्रकरणांवर कारवाई करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले. यात १८ लाख १७ हजार ५०० इतका विक्रमी दंड शासन खात्यात जमा झाला. यावेळी नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. या प्रकारे मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्यास वाहतूक शिस्त लागून अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार असा वाहतूक पोलिसांचा दावा आहे.
नागरिकांची तारांबळ
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर झालेल्या या संयुक्त कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली. अनेक वाहनधारकांनी तात्काळ आपले दंड भरून कायद्याचे पालन करण्याचा मार्ग स्वीकारला. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत, “अशा मोहिमा सातत्याने राबवल्या गेल्यास शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध होईल,” असे मत व्यक्त केले. राष्ट्रीय लोकअदालत ही केवळ दंड वसुलीची संकल्पना नसून ती वाहतूक सुरक्षितता आणि अपघातमुक्त शहर घडविण्यासाठी प्रभावी पाऊल आहे, अशी भूमिका वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली.