ठाणे : बाळ नकोसे असल्याने अवैध पद्धतीने दत्तक देणे, अवघ्या काही पैशांसाठी विक्री यांसारख्या घटनांचे जिल्ह्यात लोण वाढत असल्याचे विविध घटनांतून समोर आले आहे. मागील चार महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात तीन बालकांची अवैध पद्धतीने दत्तक प्रक्रिया राबविल्याचे उघडकीस झाले असून तीनही प्रकरणं गंभीर स्वरूपाची होती. यातील दोन घटनांमध्ये पालकांच्या समंतीने अवैध पद्धतीने दत्तक प्रक्रिया राबविल्याचे निष्पन्न झाले होते तर एका प्रक्रियेत पालकांना अंधारात ठेऊन संबंधित डॉक्टरनेच बाळाला परस्पर दत्तक दिल्याचे प्रकरण समोर आले होते.
ठाणे जिल्ह्यात डोंबिवली आणि नेरुळ येथे बालसंगोपन केंद्र आहे. या केंद्रातून मूल दत्तक घेण्यासाठी पालकांना मोठ्या प्रक्रियेतून सामोरे जावे लागते. देशांतर्गत पालकांना आणि देशाबाहेरील पालकांनादेखील या केंद्रांमधून मूल दत्तक घेण्याची शासनातर्फे मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रांमधून मुलांना दत्तक घेण्यासाठी केंद्रीय दत्तक संसाधन संस्था (कारा) या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागते. दत्तक गेलेल्या मुलांचे संगोपन नीट व्हावे आणि ते सुरक्षित स्थळी जावे यासाठी कारामार्फत तपासणी प्रक्रिया केली जात असल्याचे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागातर्फे सांगण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियेतून वाचण्यासाठी अनेकदा दाम्पत्य अवैध पद्धतीने दत्तक प्रक्रिया राबवितात. यामुळे दत्तक गेलेल्या बालकाच्या सुरक्षिततेचा देखील प्रश्न उपस्थित होतो. तसेच योग्य कुटुंबात बाळ दत्तक गेले आहे का याबाबत जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती उपलब्ध नसते. यामुळे अवैध पद्धतीने दत्तक प्रक्रिया राबविणाऱ्या कुटुंबियांवर जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीन गंभीर प्रकरणं

एका अंध दाम्पत्याचे नवजात शिशु डॉक्टरने पालकांची फसवणूक करून आर्थिक फायद्यासाठी परस्पर दत्तक दिल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला होता. तर उल्हासनगर येथे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने चक्क दहा हजारात आपले मूल अवैध पद्धतीने दत्तक दिल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. तर मागील तीन दिवसांपूर्वी कल्याण येथे राहणाऱ्या दोन महिलानी संगनमत करून रुग्णालयात खोटे कागपत्र दाखल करून बाळाची अवैध दत्तक प्रक्रिया राबविल्याचे समोर आले.

अवैध दत्तक प्रक्रिया प्रकरण

२०२१ – ४

२०२२ – २

२०२३ – ४

२०२४ – ४

२०२५ – २

ज्या नागरिकांना मूल दत्तक घ्यायचे असेल त्यांनी सर्वप्रथम जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाला संपर्क साधावा. तसेच १०९८ या क्रमांकावर संपर्क साधल्यास नागरिकांना मूल दत्तक घेण्याबाबत संपूर्ण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाईल. नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडून मूल दत्तक घेण्याच्या गैर प्रक्रियेने जाऊ नये असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various incidents revealed that illegal adoptions of unwanted babies and their sale for mere pennies are on rise in district sud 02