लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणेः अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला २१ जानेवारी रोजी डोंबिवलीतील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात १ लाख ११ हजार १११ दिव्यांमधून प्रभू श्री रामाचे चित्र साकारला जाणार आहे. या दिपोत्सवाची विश्वविक्रम म्हणूनही नोंद करण्यासाठी आयोजकांनी तयारी केली आहे. तसेच येथे महाआरतीदेखील पार पडणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या जयघोष श्रीरामाचा हा कार्यक्रम आयोजित केला असून यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि कळवा, डोंबिवली, दिवा, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथमधील नऊ ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने चक्की नाका येथे अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येते आहे. तर डोंबिवलीत स्थानिक पै. लायब्ररीच्या मदतीने पुस्तकांचे मंदिर उभारले जाते आहे. कळव्यातील ९० फुट रस्ता, कळवा नाका, शिळफाटा चौक, डोंबिलीतील फडके रस्ता, सावळाराम क्रीडा संकुल आणि घरडा चौक, कल्याणमधील चक्की नाका, उल्हासनगरातील गोल मैदान, चालीया मंदिर, झुलेलाल मंदिर तर अंबरनाथमधील बाह्यवळण रस्ता आणि प्राचीन शिवमंदिर अशा दहापेक्षा अधिक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे.
आणखी वाचा-कल्याण शहरातील २२ रस्त्यांवर वाहने उभी करण्यास वाहतूक विभागाकडून प्रतिबंध
२१ जानेवारी रोजी ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या शेजारील मैदानात भव्य दिपोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी या मैदानात भव्य रांगोळी साकारली जाणार आहे. या रांगोळीवर १ लाख ११ हजार १११ दिव्यांची आरास केली जाणार आहे. या दिपोत्सवाची विश्वविक्रम म्हणून नोंद केली जाणार आहे. त्यासाठी तयारी करण्यात आली असून हा दिपोत्सव देशातील सर्वात मोठा दिपोत्सव ठरण्याची आशा आयोजकांनी व्यक्त केली आहे. इंडिया वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी या दिपोत्सवाच्यावेळी मैदानात उपस्थित राहतील.
रामायण
एकेकाळी रामायण आणि महाभारत मालिकेतून प्रसिद्ध झालेले पुनीत इस्सार, सिद्धांत इस्सार आणि बिंदू दारा सिंग यांच्या जय श्री राम रामायण या विशेष कार्यक्रमाचे आयोजन २२ जानेवारी रोजी कल्याण पूर्वेतील गुणगोपाल मैदानात करण्यात आले आहे. त्यापूर्वी २० जानेवारी रोजी प्रसिद्ध गायिका गीतांजली राय आणि २१ जानेवारी रोजी गायक पवन सिंग यांचे गायन होणार आहे.