डोंंबिवली : येथील एमआयडीसीतील आजदे पाडा भागात बालाजी मंदिर परिसरातील एका रस्त्यावरील जलवाहिनी काही महिन्यांपासून फुटली आहे. या जलवाहिनीतील पाणी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरून वाहून जाते. या रस्त्यावरील सततची वर्दळ आणि रस्ता सतत जलमय राहत असल्याने या रस्त्यावरील चिखलामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. पालक, विद्यार्थ्यांचे या रस्त्यावर सर्वाधिक हाल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुचाकी स्वार या जलमय रस्त्यावरून घसरण्याचे प्रमाण अधिक आहे. विद्यार्थी, पालकांची या रस्त्यावरून वर्दळ असते. लहान मुलांना शाळेत घेऊन जाताना, घरी नेताना पालकांना कसरत करावी लागते. पालिकेचा जलवाहिनीवरील पाणी पुरवठा सुरू झाला की या फुटलेल्या जलवाहिनीतून अधिक प्रमाणात पाणी रस्त्यावर येते, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या.

हेही वाचा…चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती

आजदे पाड्यातील बालाजी मंदिर रस्त्याच्या विरुध्द दिशेकडील रस्त्यावर हा प्रकार सुरू आहे. या चिखलमय रस्त्यामुळे नागरिकांना अन्य रस्त्याने जाण्याचा पर्याय निवडावा लागतो. या रस्त्यावरून वाहने जात असताना अंगावर पाणी उडते. त्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. या गळक्या जलवाहिनीविषयी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेतली जात नाही, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या.

या रस्त्याच्याकडेला चाळी आहेत. पाण्याचा प्रवाह वाढला की रस्त्यावरील पाणी चाळीच्या दिशेने जाते. त्यामुळे चाळींसमोर सतत ओलावा राहतो. या सततच्या ओलाव्याला कंटाळून येथील रहिवासी अन्य भागात राहण्यास गेल्याचे समजते. आजदे पाड्यातील रस्त्यावरून पाणी वाहत असताना त्याच रस्त्यावर दुतर्फा मोटारी, दुचाकी वाहने उभी करून ठेवलेली असतात. या भागात पदपथ नाहीत. या भागात सुरू असलेल्या इमारत बांधकामांचे साहित्य रस्त्यावर पडलेले असते. त्यामुळे चालायचे कोठून असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

हेही वाचा…स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’

पालिकेने या गळक्या वाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एमआयडीसीच्या हद्दीत हा भाग येतो. एमआयडीसी अधिकाऱ्यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी आहे. पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, शहराच्या विविध भागातील गळक्या जलवाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या जलवाहिन्या दुरूस्त करण्यासाठी शहराचा पाणी पुरवठा बंद करावा लागतो. त्यानंतर हे काम करावे लागते. यापूर्वी अशाप्रकारे पाणी पुरवठा बंद ठेऊन गळक्या जलवाहिन्या दुरुस्त करण्यात आल्या. येत्या २ जानेवारी रोजी कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा जलशुध्दीकरण केंद्र दुरुस्ती आणि शहराच्या विविध भागातील गळक्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत हेही काम केले जाईल.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water channel in street near balaji temple in ajde pada area of midc in dombivli burst for few months sud 02