कल्याण – कल्याण डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी (ता.१२) मोहिली येथील उदंचन, जलशुद्धीकरण केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत टाटा पाॅवर कंपनीकडून पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रांना पुरवठा करणाऱ्या फिडरच्याही दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी कल्याण, डोंबिवली शहरांना सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे यांत्रिकी विभागाचे राजू राठोड यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंदच्या कालावधीत कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम, कल्याण ग्रामीण, मांडा, टिटवाळा, वडवली, चिकणघर, शहाड, आंबिवली, अटाळी परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांना टाटा पाॅवर कंपनीच्या कांबा येथील फिडरमधून महावितरण कंपनी विद्युतपुरवठा करते. टाटा पाॅवर कंपनीला आपल्या कांबा येथील फिडर दुरुस्तीचे काम करायचे आहे. त्यामुळे कांबा केंद्रातून जलशुद्धीकरण केंद्राला होणारा वीजपुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे. याच कालावधीत पालिकेकडून मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

हेही वाचा – ठाण्यात आता ज्येष्ठांना मोफत बस प्रवास, महिलांना ५० टक्के सवलत

हेही वाचा – कल्याणमध्ये बनावट मद्याचा ४३ लाखांचा साठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी बुधवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता विचारात घेऊन नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply to kalyan dombivli towns shutdown on this day ssb