ठाणे – आताच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक क्षणाशी शर्यत करणाऱ्या मुंबईकर प्रवाशांसाठी लोकल गाडी ही केवळ प्रवासाचे साधन नाही, तर ती त्यांची ‘जीवनवाहिनी’ म्हणून संबोधली जाते. सकाळ सायंकाळच्यावेळी लोकल गाड्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर प्रवासी प्रवास करतात. अनेकदा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा समूह तयार होतो. अशाच प्रकारे पुरूषांच्या डब्यांमध्ये दररोज सकाळ सायंकाळ भजन गात प्रवास केला जात असतो. दरम्यान नवरात्रीनिमित्त महिलांदेखील लोकल गाडीतच गरबा खेळत उत्सव साजरा केला आहे.
नवरात्रौत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. दररोज रात्री हिंदी मराठी चित्रपटांमधील गाण्यांवर ठेका धरत गरबा खेळला जातो. त्यामुळे मागील काही वर्षापासून नवरात्रौत्सवात खेळला जाणाऱ्या गरब्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबई, ठाण्यासह मुख्य शहरांमधील नेत्यांकडून तसेच सार्वजनिक मंडळांकडून रास-गरब्याचे आयोजन केले जाते. या रास- गरब्यामध्ये सहभागी होत गरब्यावर ठेका धरतात. यामुळे या ठिकाणी गर्दी दिसून येते. मात्र, अनेकदा नोकरीवर जाणाऱ्या नागरिकांना गरबा खेळण्यासाठी जाणे शक्य होत नाही. त्यातच लोकल गाडीत नवरात्रौत्सवानिमित्त अनेक महिलांचा समूह नवरात्रीच्या नऊ रंगाचे पारंपारिक कपडे परिधान करून फोटो काढत सण साजरा करत असता. तसेच नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या आराधनेसोबत आनंदोत्सव साजरा करण्याची लोकलमधील महिलांची कल्पक पद्धत वापरली.
सकाळच्या किंवा संध्याकाळच्या गर्दीच्या लोकलमध्ये, कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढत महिलांनी एकत्र येऊन लोकल गाडीतच गरबा खेळला. या उपक्रमाने प्रवासातही उत्सवाचा उत्साह दिसून आला. तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिलांनी मुंबईच्या लोकल गाडीत गरबा खेळला. अनेकांनी या अनोख्या क्षणांचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर प्रसारित केले. रोजच्या धावपळीच्या प्रवासातून थोडा वेळ काढत महिलांनी सण साजरा केला.
तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिलांनी मुंबईच्या लोकल गाडीत गरबा खेळला. अनेकांनी या अनोख्या क्षणांचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर प्रसारित केले. रोजच्या धावपळीच्या प्रवासातून थोडा वेळ काढत महिलांनी सण साजरा केला.https://t.co/2jrmCKw8Ui#viralvideo #Garba #local… pic.twitter.com/CMKF3HeJxz
— LoksattaLive (@LoksattaLive) September 26, 2025
दसराही केला जातो उत्साहात साजरा
मुंबईकरांच्या जीवनवाहिनीत अनेक प्रवाशांचे समूह तयार झाले आहेत. अनेकदा हे प्रवासी एकत्र येऊन वाढदिवस तसेच इतर क्षण साजरे करत असतात. त्याचप्रमाणे सण देखील उत्साहात साजरे केले जाते. महिला प्रवाशांमध्ये नवरात्रीनिमित्त नवनविन रंगांचे पारंपारिक पोशाख परिधान करून सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे दसरा देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यामध्ये लोकल गाडीला हार, फुले, पताकांनी सजवले जाते. गाडीत देवीची प्रतिमा लावून त्याची आरती करून लोकल गाडी प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.