लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील नगर पथ विक्रेता (फेरीवाला) समितीवरील आठ प्रतिनिधींच्या निवडीसाठी ११ एप्रिल रोजी निवडणुक होणार असून या आठ सदस्यांकरिता जागा आरक्षण कसे असणार, हे पालिकेने आता जाहीर केले आहे. यानुसार यात आठपैकी पाच जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. यामुळे या समितीवर महिलांचा वरचष्मा राहणार असल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका पथ विक्रेता समितीमधील पथ विक्रेत्यांच्या प्रतिनिधींची नगर पथ विक्रेता समितीचे सदस्य म्हणून नोंदणीकृत पथ विक्रेत्यांमधून ५ वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रबोधन मवाडे यांनी जाहीर केले आहे. यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील नगर पथ विक्रेता (फेरीवाला) समितीवरील आठ प्रतिनिधींच्या निवडणुकीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. बुधवार, २६ मार्च रोजी महापालिका मुख्यालय, प्रभाग समिती कार्यालय तसेच ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर प्रभाग समितीनिहाय अशी एकूण १३६५ मतदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. शुक्रवार, ११ एप्रिल रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रभाग समिती कार्यालयात मतदान होणार असून मतमोजणी त्याच दिवशी महापालिका मुख्यालयात होणार आहे.

समितीवरील आठ प्रतिनिधींच्या निवडीसाठी जागा आरक्षण कसे असणार, हे पालिकेने आता जाहीर केले आहे. यानुसार, सर्वसाधारण गट (महिला राखीव) ३ जागा, अनुसूचित जाती (महिला राखीव) १ जागा, अनुसूचित जमाती १ जागा, इतर मागास वर्ग १ जागा, अल्पसंख्याक १ जागा, विकलांग व्यक्ती (महिला राखीव) १ जागा अशा आठ जागा राखीव असणार आहेत. यात आठपैकी पाच जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. यामुळे या समितीवर महिलांचा वरचष्मा राहणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सर्व मतदारांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि निवडणूक निर्णय अधिकारी प्रबोधन मवाडे यांनी केले आहे.

प्रभाग समितीनिहाय मतदार

प्रभाग समितीपुरुष महिला एकूण
माजिवडा-मानपाडा८५ २४ १०९
वर्तक नगर १४३ ३९ १८२
लोकमान्य नगर-सावरकर नगर१३५ ३९ १७४
वागळे ९४ १४ १०८
नौपाडा – कोपरी२७६ ६५ ३४१
उथळसर १६५ ७२ २३७
कळवा ६२ २८ ९०
मुंब्रा ७२ १७ ८९
दिवा ०८ २७ ३५
एकूण १०४० ३२५ १३६५
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women will be dominant force on nagar street vendor committee five out of eight members seats are reserved for women mrj