उपनगरीय रेल्वेची चाचणी यशस्वी

ठाणे : बहुप्रतिक्षित ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या मुंब्रा रेतीबंदर येथील उन्नत मार्गिकेवरून सोमवारपासून रेल्वेची धीम्या उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे. 

ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रविवारी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या मुंब्रा रेतीबंदर येथील उन्नत मार्गिकेवरून रेल्वेच्या वाहतूकीचे परिक्षण केले. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आज, सोमवारपासून मंदगती रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तसेच येत्या काही दिवसांत ठाणे स्थानकाजवळील कामही पूर्ण होणार आहे. त्यामुळे महिन्याभरात ठाणे ते दिवा पर्यंतची पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

कळवा येथील घोलाईनगर आणि दिवा भागात रेल्वे रूळांच्या तांत्रिक दुरूस्तीसाठी रेल्वे प्रशासनाने २४ तास मेगाब्लॉक घेतला होता.  मेगाब्लॉकमुळे कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली या रेल्वे स्थानकांमध्ये उपनगरीय रेल्वेगाडय़ा थांबविण्यात आल्या नाहीत. ठाणे महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेने त्यासाठी विशेष बससेवा सुरू केल्या होत्या.

चार दिवस गाडय़ा विलंबाने..

येत्या काही दिवसांत ठाणे ते दिवा या मार्गिकेवर काही तांत्रिक कामे केली जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस धिम्या मार्गिकेवरील उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत होणार असून या मार्गावरील वाहतूक सात ते आठ मिनीटे उशीराने होईल.