लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील कल्याण बाजुकडील सरकत्या जिन्याचे काम मागील सहा महिन्यापासून रखडले आहे. या कामासाठी लागणारे साहित्य फलाटावर आणण्यात मेगा ब्लॉक मिळत नसल्याने हे काम रखडल्याची माहिती रेल्वे सुत्रांकडून मिळाली होती. याविषयीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिध्द करताच त्यानंतर डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ आणून ठेवलेले सरकत्या जिन्याचे साहित्य रेल्वे प्रशासन आणि ठेकेदाराने फलाटावर आणून ठेवले आहे.
गेल्या सात महिन्यापासून डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील कल्याण बाजुकडील भागात सरकत्या जिन्याचे काम रेल्वेकडून सुरू करण्यात आले होते. या दिशेकडील जिना सरकता उभारण्यात येणार आहे म्हणून यापूर्वीच या भागातील पायी जाण्याचा जिना काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीन व चारवर उतरणाऱ्या प्रवाशांना माघारी जाऊन दक्षिण बाजुकडील जिन्यावरून जावे लागते. सरकत्या जिन्यासाठी खोल खड्डा आणि बाजुला संरक्षित पत्रे लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्या अरूंद भागातून जाताना कसरत करावी लागते.
रेल्वे प्रवासी संघटना, रेल्वे प्रवाशांकडून स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना सरकत्या जिन्याचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी करत होते. परंतु, प्रवाशांच्या तक्रारी ऐकून घेण्या व्यतिरिक्त कोणतीही कृती रेल्वे प्रशासनाकडून केली जात नव्हती. सरकत्या जिन्याचे साहित्य रेल्वेने काही महिन्यापूर्वीच डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ आणून ठेवले आहे. हे साहित्य पूर्व भागातून फलाट क्रमांक तीन आणि चारवर सुरक्षितपणे रेल्वे मार्गातून आणण्यासाठी मेगा ब्लॉकची गरज होती. हा मेगा ब्लॉक मिळत नसल्याने रेल्वे ठेकेदाराला सामान फलाटावर आणणे शक्य होत नाही, अशी माहिती एका विश्वसनीय रेल्वे सुत्राने दिली होती.
पावसाळ्यापूर्वी हे सरकत्या जिन्याचे काम पूर्ण केले नाहीतर फलाट क्रमांक तीनवरून मुंबईकडे जाणाऱ्या आणि फलाट क्रमांक चारवरून कर्जत, कसारा, अंबरनाथ, बदलापूर, खोपोली लोकलने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार होते. प्रवासी, रेल्वे प्रवासी संघटनेच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन ‘लोकसत्ता’ने याविषयी एक वृत्त प्रसिध्द केले होते.
यावृत्ताची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली. त्यानंतर गेल्या आठवड्यात रात्रीच्या वेळेत लोकल, लांब पल्ल्यांच्या गाड्यांची धाव कमी झाल्याचा अंदाज घेऊन सरकत्या जिन्याचे साहित्य फलाट क्रमांक तीन व चारच्या मध्यभागी आणून ठेवण्यात आले आहे. येत्या महिनाभरात हे काम पूर्ण केले जाईल, असे रेल्वे सुत्राने सांगितले.