बदलापूर: बदलापूर पश्चिमेकडील वालीवली गावात इमारतीवरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निरंजन रायता असे या कामगाराचे नाव आहे. येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत लाकडी प्लाय तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून वर नेत असताना पाय घसरून खाली पडल्याने झालेल्या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. कामगारांना सुरक्षा साधने न पुरवता काम करून घेतले जात असल्याने झालेल्या अपघातात गेल्या महिनाभरात परिमंडळ चारमध्ये चार मृत्यू झाले आहेत. या अपघाताप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात गेल्या काही महिन्यात कामगारांच्या मृत्यूची काही प्रकरणे समोर आली आहेत. उल्हासनगर शहरात जुन्या इमारतींच्या दुरूस्तीची अनेक काम सुरू असतात. मात्र या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागात फर्निचार बाजारात माया हॉटेल येथे डोक्यात सज्जाचा एक भाग पडल्याने एका कामागाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी येथील मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला अटकही झाली. असाच प्रकार यापूर्वी बदलापूर आणि अंबरनाथ शहरातही समोर आला होता. मात्र त्यानंतरही कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही सुविधा केली जात नसल्याचे समोर आले आहे.

बदलापूर शहरात यापूर्वीही एका इमारतीतून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यावेळीही बांधकाम व्यावसायिकांच्या कामगारांप्रति असलेल्या सुरक्षेचा काळजीचा मुद्दा समोर आला होता. अशाच एका अपघातात बदलापुरात आणखी एका कामागाराचा मृत्यू झाला आहे. बदलापूर पश्चिमेतील वालिवलीतील एका बांधकामाच्या ठिकाणी इमारतीवरून पडून कामगार मृत्युमुखी पडला आहे.

कामगारासाठी कोणत्याही संरक्षणासाठी कोणत्याही प्रकारचे संरक्षक भिंत, जाळया न बांधता तसेच खाली जमिनीवर असलेले मोठमोठे दगड उचलुन सपाटीकरण न करता, हयगयीने व निष्काळजीपणाने बांधकाम चालू ठेवल्याचा ठपका ठेवत बदलापूर पश्चिम पोलिसांनी प्रकरणी प्रिया इंटरप्रायजेसचे मालक आणि कारपेंटर ठेकेदार उमाशंकर गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक गागरे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.