Viral video : बेंगळुरू शहरात पुन्हा एकदा रागाच्याभरात वाहनचालकांनी घेतलेला जीवघेणा निर्णय पाहायला मिळाला आहे. कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये घडलेल्या या प्रकाराने लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वाहतुकीतील किरकोळ वाद किती मोठ्या अपघातात बदलू शकतो याचे धक्कादायक उदाहरण म्हणजे ही घटना. रस्त्यावर संयम हरवण्याचे परिणाम किती गंभीर असतात, याची जाणीव या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा झाली आहे.

हा व्हिडीओ रोड रेजच्या घटनेचा आहे, ज्यामध्ये एका कॅबचालकाने वादानंतर जाणूनबुजून त्याच्या कारने बाईकला धडक दिली. बेंगळुरूच्या केआर पुरम ब्रिज परिसरात शुक्रवारी दुपारी सुमारे १.१५ वाजता ही घटना घडली. बाईकवर दोन प्रवासी होते. चालताना त्यांच्या वाहनाने चुकून कॅबला हलका स्पर्श झाला आणि त्यावरून वाद सुरू झाला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि काही क्षणांतच हा वाद हिंसक स्वरूपात बदलला.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत ही संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसते. दुसऱ्या वाहनाच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमध्ये बाईकस्वार कॅबच्या जवळ येऊन चालकाला काहीतरी सांगताना दिसतो. त्यानंतर काही सेकंदांतच कॅबचालक मुद्दाम कार पुढे नेत बाईकला जोरदार धडक देतो. या धडकेत बाईकवरील दोघांचा तोल जातो आणि मागे बसलेला प्रवासी रस्त्यावर पडतो.

पाहा व्हिडिओ

या व्हिडीओखाली वापरकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी कॅबचालकावर कडक कारवाईची मागणी केली आहे, तर काहींनी दोघांनीही संयम बाळगायला हवा होता असं म्हटलं आहे. “रागात वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे”, “अशा चालकांचे लायसन्स रद्द केले पाहिजे”, “लोकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का?” अशा तीव्र प्रतिक्रिया नेटिझन्सनी व्हिडीओखाली दिल्या आहेत. काहींनी मात्र पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांची चौकशी करावी अशीही मागणी केली आहे.

या नव्या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे – रस्त्यावरचा राग नेमका कोणाच्या जीवावर उठणार? पोलिसांनी स्वतःहून कारवाई सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. व्हायरल व्हिडीओच्या आधारे आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी आता सोशल मीडियावरून होत आहे.