बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील एका घटनेची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. बारसोई परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) म्हणून काम करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने भावंडांना त्रास दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत संबंधित अधिकाऱ्याने एका तरुण आणि त्याच्या बहिणीशी उद्धट वर्तन केल्याचं स्पष्टपणे दिसतंय. या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आणि एसएचओला निलंबित करण्यात आलं.

ही घटना २४ ऑक्टोबर रोजी बारसोई येथील बीआर-११ रेस्टॉरंटमध्ये घडली. एक तरुण आणि त्याची बहीण तिथे बसलेले दिसत आहेत. रेस्टॉरंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, नेटकऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्याच्या वर्तनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

व्हिडीओमध्ये तो एसएचओ भावंडांच्या टेबलाजवळ येतो आणि त्या तरुणाला विचारतो, “ही कोण आहे?” त्यावर तो तरुण शांतपणे उत्तर देतो, “बहीण आहे माझी.” हे ऐकून अधिकारी अचानक आवाज चढवतो आणि त्याच्यावर “चुकीच्या आवाजात बोललास” असा आरोप करतो. तो तरुण नम्रपणे उत्तर देतो, “तू विचारलेस म्हणून मी सांगितलं की ती माझी बहीण आहे.” तरीही अधिकारी रागानं त्याच्यावर हल्ला करतो आणि दुसरा पोलिस अधिकारीदेखील वादात सामील होतो. रेस्टॉरंटमधील इतर ग्राहक हे सर्व पाहत असताना, एक व्यक्ती पुढे येऊन दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेकांनी असे म्हटले की, असे अधिकारी संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा मलीन करतात. काहींनी टिप्पणी केली, “ही वर्तणूक लाजिरवाणी आहे, नागरिकांशी असं वागणं शोभत नाही.” अनेकांनी त्या तरुणाच्या शांत स्वभावाचं कौतुक केलं.

या घटनेची दखल घेत, कटिहारच्या उपअधीक्षक (मुख्यालय) यांनी तपास सुरू केला. तपासात असे दिसून आले की, अधिकाऱ्याने अपशब्द वापरले आणि त्याचं वर्तन निष्काळजी व गैरशिस्तीचं होतं. पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्यामुळे संबंधित एसएचओला तत्काळ निलंबित करण्यात आलं असून त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.