Bunjee Jumping Video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ पाहून काळजाचा ठोकाच चुकतो. हल्ली तरुण पिढी आपल्याला हव ते करायला बघतात. पण मग त्यात असणारे धोकेही ते विसरून जातात. सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी म्हणा किंवा आनंदासाठी म्हणा जीवावर बेतेल अशा अनेक गोष्टी अनेकांना करून पाहायच्या असतात. पण अनेकदा तरुणाईची हीच मस्ती जीवावर बेतते.
अॅडवेंचरच्या नावाखाली अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला जातात. हल्ली बंजी जंपिंग, झिप लाईनिंग करताना अनेक अपघात झाल्याचं आपण वाचलं ऐकलं असेल. सध्या असाच प्रकार एका तरुणीबरोबर घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात बंजी जंपिंग करताना तिचा मृत्यू झाल्याचं बोललं जातंय. नेमकं काय घडलंय, ते जाणून घेऊ या…
बंजी जंपिंग व्हायरल व्हिडीओ (Bunjee Jumping Viral Video)
तरुणीचा हा धक्कादायक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत एक तरुणी बंजी जंपिंग करताना दिसतेय. इतक्या उंचावरून बंजी जंपिंग करताना ती अगदी आनंदात आणि कॉन्फिडंट दिसत आहे. पण तिचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. व्हिडीओच्या कॅप्शननुसार बंजी जंपिंग केल्यानंतर तिच्या मानेचं हाड मोडलं आणि त्यामुळे या तरुणीचा मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकलं नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @official_the_original_files या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ४.४ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तसंच “बंजी जंपिंग करताना मानेचं हाड मोडून तरुणीचा मृत्यू ” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलेली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “सरकारने या प्रकारच्या मूर्खपणावर बंदी घालावी.”, तर दुसऱ्याने “ही गोष्ट खूप धोकादायक आहे, हे माहित असूनही का करायला जायचं मग” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “जीव एवढा स्वस्त असतो का?”