करोनामुळे जगभरामध्ये दहशत निर्माण झाली आहे. करोनाच्या संसर्गामुळे लाखो लोकांचा बळी गेला आहे. त्यातच जगातील काही भागांमध्ये निर्सगानेही रौद्र रुप दाखवण्यास सुरुवात केली आहे. अगदी आफ्रिकेमधील केनियासारख्या देशामधील पूरापासून ते बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या अम्फन या महाचक्रीवादळापर्यंत अनेक नैसर्गिक आपत्तींनाही तोंड द्यावे लागत आहे. असं असतानाच मॅक्सिकोमधील काही भागांमध्ये गारांचा पाऊस पडल्याने तेथील नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र या नागरिकांच्या सामोरे जाव्या लागण्या अडचणींपेक्षा या भागामध्ये पडलेल्या गारांचा आकार सध्या चर्चेचा विषय आहे. या गारा चक्क करोना विषाणूच्या आकाराच्या आहेत. त्यामुळे अनेकांना हा गारांचा पाऊस म्हणजे देवाने दिलेला इशारा असल्याचे वाटत आहे असं द डेली मेलने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

फोटो सौजन्य: रॉयटर्स

मेक्सिकोच्या उत्तरेकडे असणाऱ्या न्यूवो लियोन राज्यमधील मोंटेमोरेलोस शहरामध्ये गारांचा पाऊस झाला. मात्र यानंतर येथील स्थानिकांनी गारांचे फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करत गारा करोना विषाणूच्या आकाराच्या असल्याचे म्हटले आहे. स्थानिकांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये गोल आकाराच्या गारांना काट्यांसारखी टोकं असल्याचेही दिसत आहे. काही स्थानिकांनी हा देवाचा प्रकोप असल्याची भिती व्यक्त केली आहे.

अशाप्रकारे करोना विषाणूच्या आकाराच्या गारांचा पाऊस केवळ मॅक्सिकोमध्ये झालेला नाही. वेगवेगळ्या देशांमधील लोकांनी आपल्या भागामध्ये झालेल्या पावसामध्ये करोना विषाणूच्या आकाराच्या गारा पडल्याचा दावा केला आहे. साऊदी अरेबियामधील एका व्यक्तीनेही अशाप्रकारचा दावा केला आहे.

१)

२)

३)

४)

फोटो सौजन्य: सीईएन

५)

फोटो सौजन्य: सीईएन

मात्र हवामान श्रेत्रातील तज्ज्ञांनुसार आशा आकाराच्या गारा पडणे अगदी सामान्य गोष्ट आहे. हवामानशास्त्रज्ञ आणि जागतिक हवामान संस्थेचे (डब्ल्यूएमओ) सल्लागार असणाऱ्या जोस मिगुएल विनस यांनी या करोना आकारच्या गारांबद्दल स्पष्टीकरण दिलं. अनेकदा जोरदार वादळ आणि वाऱ्यासहीत गारांचा पाऊस होतो तेव्हा गारा एकमेकांना आदळतात आणि त्यांचा आकार बदलतो. एकमेकांना आदळल्याने किंवा मोठ्या आकाराच्या गारेचे तुकडे होऊन छोट्या आकाराच्या गारा तयार होताना असा आकार गारांना येतो. आधीच करोनामुळे मॅक्सिकोमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असताना या गारांच्या पावसामुळे स्थानिकांमध्ये आणखीन भिती निर्माण झाली आहे. वेगवेगळे तर्तवितर्क लावले जात असले तरी अशा आकाराच्या गारा सामान्य आहेत असं हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मॅक्सिकोमध्ये बुधवारपर्यंत (२० मे २०२०) ५४ हजारहून अधिक करोनाग्रस्त अढळून आले आहेत.