CEO Laid Off 90% Staff After AI Chatbot Outperformed : गेल्या काही वर्षांपासून भारतातील अनेक कंपन्या नोकर कपातीचा निर्णय घेतला. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आले, अशा परिस्थितीत शिक्षण असूनही कर्मचाऱ्यांना नोकरीसाठी वणवण भटकावे लागत आहे. यात बंगळुरुमधील एका टेक स्टार्टअप कंपनीच्या सीईओने तब्बल ९० टक्के कर्मचाऱ्यांना एकाचवेळी नोकरीवरून काढत हद्दच केली, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्यानंतर चक्क जंगी सेलिब्रेशन केले आहे. सीईओच्या या असंवेदनशील वागण्यावर आता संताप व्यक्त केला जात आहे.
‘दुकान’ असे या कंपनीचे नाव असून सुमीत शाह हे या कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, या कंपनीच्या माध्यमातून व्यापार्यांना त्यांचे ई-कॉमर्स स्टोअर्स उभारण्यास मदत केली जाते. पण या कंपनीतून आता त्यांनी तब्बल ९० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. यांनी सोमवारी एका ट्विटर पोस्टमध्ये सांगितले की, AIआधारित चॅटबॉटमुळे त्यांना त्यांच्या ९० टक्के सपोर्ट टीमला काढून टाकावे लागले. ज्यामुळे आता त्यांच्या कंपनीला फायदा झाला. पण या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
या निर्णयानंतर सुमित शाह यांनी पोस्ट शेअर करत म्हटले की, एआय चॅटबॉटच्या मदतीने त्यांना त्यांच्या ग्राहकांना फर्स्ट रिअॅक्शन देण्यासाठी आता खूप कमी वेळ लागत आहे. याच्या मदतीने रिअॅक्शन देण्यासाठी लागणारा वेळ १ मिनिट ४४ सेकंदांपेक्षा कमी झाला आहे. तसेच खर्चही ८५ टक्क्यांनी कमी झाला आहे.
एका ट्विटर थ्रेडमध्ये त्यांनी ग्राहकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकणार्या एआय चॅटबॉटची कल्पना कशी सुचली हे स्पष्ट केले. मात्र सुमित शाह यांचे ट्विटर थ्रेड नेटकऱ्यांना मात्र अजिबात पसंत पडलेले नाही. नेटकऱ्यांनी हा निर्णय अतिशय असंवेदनशील असल्याचे म्हणत त्यांच्यावर सार्वजनिकपणे टाळेबंदीचा आनंद साजरा केल्याचा आरोप केला आहे.
ट्विटर युजर्सनी सीईओवर केली जोरदार टीका
नेटिझन्सनी त्यांच्यांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी ट्विटच्या कंटेट हुक-अप म्हणून ९० टक्के छाटणीचा वापर केल्याचा आरोप देखील केला. एका युजरने प्रश्न उपस्थित करत लिहिले की, ‘अपेक्षेप्रमाणे, कामावरून काढलेल्या कर्मचार्यांपैकी ९० टक्के कर्मचाऱ्यांचा कोणताही उल्लेख आढळला नाही. त्यांना कोणती मदत देण्यात आली?’ यावर सुमित शाह यांनी युजरला उत्तर देत म्हटले की, ‘कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल लिंक्डइनवर पोस्ट करणार आहे’. तर दुसर्या एका युजरने लिहिले की, ‘यार, तुम्ही तुमच्या सपोर्ट टीममधील ९० टक्के लोकांचे आयुष्य खराब केले आहे आणि तुम्ही त्याचे सार्वजनिकरित्या सेलिब्रेशन करत आहात. अशाने तुम्ही कदाचित तुमचा कस्टमर सपोर्ट देखील कमी करत आहात. यातून तुम्ही किती खालची पातळी गाठली हे स्पष्ट होतेय’. तिसर्या एका युजरने लिहिले की, ‘कदाचित हा व्यवसायासाठी योग्य निर्णय होता, परंतु तो आनंदाने साजरा करण्यासारखा विषय नव्हता’.