Ganga Drowning Rescue Video: गंगेत डुबकी मारणे ही पुण्य कमावण्यासाठी एक सामान्य कृती… पण एका क्षणात ही डुबकी बनली मृत्यूच्या दाराशी पोहोचण्याचा अनुभव. गंगेच्या प्रचंड प्रवाहात वाहू लागलेला एक कावडिया, अडथळ्याने भरलेली धारा आणि त्याच क्षणी धावून आलेले देवदूत. हा सगळा थरार तुमचेही श्वास रोखून धरेल. कारण- या वेळेस फक्त श्रद्धा नव्हती, तर जीवन-मरणाचा संघर्षही होता. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या..
श्रावण महिना… श्रद्धेचा महासागर… आणि हरिद्वारमध्ये लाखोंच्या संख्येने आलेले कावडियांचे लोंढे. प्रत्येक जण गंगेत डुबकी मारत पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, भक्तीच्या अशा लाटांमध्ये कधी काळी संकटाची छायाही असते, हे नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं सिद्ध केलं. हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
हरिद्वारमधील गंगा घाटावरचा हा थरकाप उडवणारा क्षण होता. एक युवक गंगेत स्नान करत असताना, अचानक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहू लागतो. तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, हात-पाय मारतो, पण गंगेचा प्रवाह इतका वेगवान असते की, तो पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जातो. त्या क्षणी घाटावर तैनात असलेला एसडीआरएफचा एक जवान क्षणार्धात परिस्थिती ओळखतो आणि क्षणाचाही विलंब न करता गंगेत उडी घेतो.
तो जवान त्या युवकापर्यंत पोहतो; पण जलप्रवाह जबरदस्त असतो. त्याच वेळी आणखी एक जवान मदतीसाठी पाण्यात उडी मारतो. एसडीआरएफची एक गस्त करणारी बोटही तत्काळ घटनास्थळी येते. सर्व जवान मिळून, त्या युवकाला बाहेर काढतात आणि बोटीत सुरक्षित बसवतात. केवळ एक जीव वाचतो असे नव्हे, तर हजारो भाविकांच्या मनातील परमेश्वरावरील सुरक्षेबाबतचा विश्वास आणि एसडीआरएफ जवानांबद्दलचा आदर दुणावतो.
हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी सोशल मीडियावर एसडीआरएफच्या जवानांनी दाखविलेलं धाडस आणि त्यांची तत्परता यांचं भरभरून कौतुक केलं आहे. कोणीतरी म्हटलं, “हे जवान रक्षक नाहीत, तर खरे देवदूत आहेत,” तर कुणीतरी लिहिलं, “असेच खरे नायक असतात, जे कोणताही विचार न करता दुसऱ्याचा जीव वाचवतात.”
मिळालेल्या माहितीनुसार, केवळ दोन दिवसांत एसडीआरएफने तीन लोकांचे जीव वाचवले आहेत. याआधीही दोन तरुण गंगेत वाहत गेले होते; पण या जवानांनी त्यांना वेळीच वाचवलं.
येथे पाहा व्हिडीओ
ही घटना केवळ एक अपघात नव्हे, तर माणुसकी, धैर्य व तत्परता यांचं अनोखं उदाहरण आहे. जेव्हा श्रद्धा आणि संकट एकाच वेळी समोर येतात, तेव्हा अशाच नायकांमुळे समाज उभा राहतो.